
मनोज सातवी
पालघर जिल्ह्यातील 18 मच्छीमार खलाशी 4 वर्षापासून पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेले आहेत. मासेमारी करताना चुकून पाकिस्तान हद्दीत गेलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील मच्छिमारांना पाकिस्तान सरकारने कैद केले आहे. मात्र राष्ट्रीयत्व सिद्ध केल्यानंतरही हे खलाशी सुटकेच्या प्रतिक्षेत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे या मच्छीमार खलाशांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. पण त्याकडे ही लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. अशा स्थितीत करायचे काय असा प्रश्न या खलाशांच्या कुटुंबीयांना पडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पालघरच्या डहाणू, तलासरीसह परिसरातील 18 खलाशी मागील चार ते साडेचार वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेत आहेत. मच्छीमार बोटीवर खलाशी म्हणून काम करण्यास गेलेल्या डहाणूच्या अस्वालीसह परिसरातील तीस खलाशांना, मागील चार ते पाच वर्षांपूर्वी समुद्रातील देशाची सीमा ओलांडल्याने पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं होतं. यातील 11 खलाशांची मागील वर्षी सुटका करण्यात आली. तर एका खलाशाचा पाकिस्तानी कैदेतच मृत्यू झाला. मात्र यापैकी अठरा खलाशी शिक्षा पूर्ण होऊनही पाकिस्तानच्या कैदेत आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय सध्या मोठ्या चिंतेत आहेत.
मागील चार वर्षांपासून या खलाशांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत आहेत. ते मोठ्या समस्यांना तोंड देत आहेत. घरातील कर्ता पुरुषच पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने कुटुंब चालवायचं कसं ? मुलांचे शिक्षण करायचं कसं ? असा प्रश्न उपस्थित करताना या कुटुंबीयांना अश्रू अनावर होत आहेत. आता सरकारने यात हस्तक्षेप करून त्यांची सुखरूप सुटका करून आमच्या माणसांना घरी सुखरूप आणावं अशी मागणी होत आहे. मात्र सरकार याकडे लक्ष देणार का हाच खरा प्रश्न आहे.
मासेमारी करताना समुद्रात देशाची सीमा लक्षात न आल्याने राज्यातील 200 पेक्षा अधिक मच्छीमार खलाशांना आतापर्यंत पाकिस्तानी कैदेत ठेवण्यात आलं आहे. शिक्षा पूर्ण होताच त्यांची सुटका करण्यात येईल अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबियांना होती. मात्र पालघर मधील 18 खलाशी अजूनही सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत. स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने डहाणू ,तलासरी , विक्रमगड या भागातील अनेक आदिवासी बांधव मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून कामाला जातात.
असेच 18 खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात असून सरकार त्यांना सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप आता त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय . विशेष म्हणजे गुजरात सरकार पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या मच्छीमार खलाशांच्या कुटुंबियांना तीनशे रुपये प्रति रोज देत आहे. महाराष्ट्र सरकारने देखील अशीच घोषणा केली होती. मात्र आजपर्यंत कोणतीही मदत या कुटुंबांना मिळाली नसल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्ते गणपत भूजड यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - पार्किंगमुळे प्रेम जुळलं, पण शेवट भयंकर! प्रियकराने नर्सला शेतात नेलं अन्...
पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या मच्छीमार खलाशांच्या सुटकेसाठी अनेक संघटना वेळोवेळी पाठपुरावा करतात. मात्र सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. पाकिस्तानच्या तुरुंगात अडकलेल्या पालघरमधील या 18 मच्छिमारांना सोडवण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारत पाकिस्तान शांततावादी कमिटीचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी मत्स्यव्यवसाय तथा बंदर मंत्री नितेश राणे यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे. एकीकडे भारत पाकिस्तान दरम्यान वेगवेगळ्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणारे केंद्र आणि राज्य सरकार, तसेच सत्ताधारी पक्षातले नेते, मंत्री पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या मच्छीमारांच्या सुटकेसाठी मात्र निष्क्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world