लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
भाऊबंदकी आणि जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची सुपारी देऊन खून केल्याची घटना जालना जिल्ह्यातील सेवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर शिवारात घडली होती. यात पायगाव गावातील रमेश शेळके यांची त्यांच्या सख्ख्या भावाने सुपारी देऊन हत्या घडवून आणली. शेळके यांना मेहकर तालुक्यात अंजनी खुर्द फाट्यावर नेत त्यांच्या डोक्यात दगड टाकून दोरीने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला होता. आरोपींनी त्यांना चारचाकी वाहनात टाकलं. यानंतर जालना तालुक्यातील नागापूर शिवारात मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावली आणि गाडी दरीत ढकलून दिली. हत्या केल्यानंतर त्यांनी पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी अपघाताचा बनाव करण्यात आला होता.
या प्रकरणी सेवली पोलीस ठाण्यात अपघाताची नोद करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. हा अपघात नसल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तपासाचा वेग वाढवला. मृत रमेश शेळके यांचा भाऊ रामप्रसाद शेळके, सविता शेळके (भावजय), संदिप शेळके (पुतण्या), सचिन शेळके (पुतण्या) यांच्या चौकशीतून संशय वाढला. तपासात पोलिसांनी शेळके यांचा मुलगा अभिमन्यु याच्या मदतीने आरोपी कृष्णा चौधरी,आकाश कुहीरे दोघे (रा. सिंदखेड राजा) यांना ताब्यात घेतलं. यानंतर त्यांनीच मेहकर तालुक्यात अंजनी खुर्द फाट्यावर डोक्यात दगड टाकून दोरीने गळा आवळून रमेश शेळके यांचा खून केल्याचं समोर आल्याने याप्रकरणी सेवली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नक्की वाचा - पतीशी वाद, पत्नीचं टोकाचं पाऊल, 2 चिमुकल्यांबरोबरही भयंकर केलं
या खुनात प्रत्यक्षदर्शीचा पुरावा नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. विलास मोरे यांनी तंत्रशुद्ध पध्दतीने तपास करून मृत रमेश शेळके यांची हत्या करून त्यांचे शरीर सेवली हद्दीतील नागापूरच्या डोंगरात त्याच्याच गाडीत जाळून पूरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याचे सबळ पुरावे गोळा करत जिल्हा सत्र न्यायालया समोर ठेवण्यात आले. या प्रकरणात आरोपी अर्जुन दांडाईत, आकाश कुहीरे, कृष्णा चौधरी या तिघांना जन्मठेप आणि 10,000 रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर तसेच अभिमन्यू दांडाईत यास 6 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. इतर 4 आरोपी सचिन शेळके, रामप्रसाद शेळके, सविता शेळके, संदिप शेळके यांना पुराव्या अभावी दोषमुक्त करण्यात आलं आहे.