जाहिरात

Ahilyanagar: थरारक! भरवस्तीत दुचाकीस्वाराचा अंदाधुंद गोळीबार; कुख्यात गुंड सागर मोहळकर रक्ताच्या थारोळ्यात

Jamkhed Firing: जामखेडमध्ये कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

Ahilyanagar: थरारक! भरवस्तीत दुचाकीस्वाराचा अंदाधुंद गोळीबार; कुख्यात गुंड सागर मोहळकर रक्ताच्या थारोळ्यात
Jamkhed Firing: जामखेडमध्ये कुख्यात गुंड सागर मोहळकरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
अहिल्यानगर:

प्रसाद शिंदे, प्रतिनिधी

Jamkhed Firing: अहिल्यानगर जिल्ह्यातले जामखेड पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले आहे. जामखेडमध्ये कुख्यात गुंड सागर मोहळकरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शहरातील न्युरानी कॉलनी परिसरात बुधवारी संध्याकाळी 7 ते 7:30 च्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने सागरवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जामखेड परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सागर मोहळकर हा न्युरानी कॉलनी भागात असताना मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराने एकूण 7 राउंड फायर केले. यातील 4 गोळ्या सागरच्या अंगात घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

गोळीबाराचा आवाज होताच परिसरात पळापळ सुरू झाली आणि हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमी सागरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

( नक्की वाचा : Pune News: सुटकेसाठी पत्नीने पतीला दिले 50,000 रुपये; पुण्यातील 'त्या' घटस्फोटाची मोठी चर्चा )
 

मोहळकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी 

सागर मोहळकर हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कलम 307 नुसार त्याच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. जामखेड परिसरात त्याची मोठी दहशत होती आणि तो नशेच्या आहारी गेला असल्याची माहितीही समोर आली आहे. 

विशेष म्हणजे, अवघ्या 2 दिवसांपूर्वीच सागरच्या वडिलांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती.


( नक्की वाचा : Pune News आधी चारित्र्यावर शिंतोडे, मग DNA चाचणी आणि अखेर अंगावर काटा आणणारा निकाल; 'या' प्रकरणाने सर्व हादरले )

पुढील उपचारासाठी नगरला हलवले

सागरची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

या गोळीबारामागे जुना वाद होता की गँगवॉरचा प्रकार आहे, याचा तपास आता जामखेड पोलीस करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com