Kalyan News : कल्याणजवळील म्हराळ परिसरात एका 30 वर्षांच्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीप्रकरणी पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिल्याने, आरोपीने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने पीडित मुलीच्या मामाचा काटा काढला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून टिटवाळा पोलिसांनी अवघ्या एका तासात तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
म्हारळ येथील मालखन कंपाऊंडमध्ये राहणारे रवींद्र अहिरे यांची शुक्रवारी रात्री हत्या झाली. रवींद्र यांच्या मानलेल्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीची दीपक डांगे नावाच्या तरुणाने छेड काढली होती. मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर, आईने ही बाब रवींद्र यांच्या निदर्शनास आणून दिली. रवींद्र यांनी बहिणीला या प्रकरणी गप्प न बसता टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. हीच बाब आरोपी दीपक डांगेला समजली आणि त्याने रवींद्र यांच्या हत्येचा कट रचला.
( नक्की वाचा : Pune News: ज्याच्यावर विश्वास टाकला, त्यानेच माऊलींचा खजिना लुटला; आळंदी हादरली! )
धारदार शस्त्राने केला हल्ला
आरोपी दीपक डांगे याने विजय भिडे आणि परशुराम भिडे या आपल्या दोन साथीदारांना सोबत घेऊन रवींद्र अहिरे यांना गाठले. या तिघांनी रवींद्र यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. छेडछाडीसारख्या गंभीर प्रकाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांची जलद कारवाई
घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनेनंतर अवघ्या 1 तासाच्या आत मुख्य आरोपी दीपक डांगे याच्यासह विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांना अटक केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.