- कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी तन्वीर खानला पत्नी आणि मेहुण्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली होती
- जेल कस्टडीत असताना तन्वीरने पत्नीला फोन करून धमकी दिली आणि केस मागे घेण्याचा दबाव टाकला
- तन्वीर आणि त्याच्या कुटुंबीयांनी रुखसार आणि तिच्या भावाला भररस्त्यात बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते
अमजद खान
तलाकच्या वादातून पत्नी आणि मेहुण्याला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपी पतीने चक्क जेल परिसरातून पत्नीला फोन केला. ऐवढेच नाही तर त्याने धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी या प्रकरणात तन्वीर खान याला अटक केली होती. मात्र, जेल कस्टडीत असतानाही तन्वीरने पत्नीला फोन केल्याने कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धमकी दिल्यानंतर पत्नीने ही त्याला जशास तसे उत्तर दिले आहे.
कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात राहणारा तन्वीर खान आणि त्याची पत्नी रुखसार खान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादावर पडदा टाकण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीत वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तन्वीर आणि त्याच्या कुटुंबीयांनी भररस्त्यात रुखसार आणि तिच्या भावाला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तन्वीरला अटक केली, तर त्याचे वडील आणि भाऊ अद्याप फरार आहेत. या मारहाणीत रुखसार आणि तिचा भाऊ जबर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुधवारी कल्याण न्यायालयाने तन्वीरची रवानगी जेल कस्टडीत केली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजून २७ मिनिटांनी रुखसारला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. "मैं तन्वीर बोल रहा हूँ," असे म्हणत त्याने केस मागे घेण्यासाठी रुखसारवर दबाव टाकला. जवळपास 3 मिनिटे हे संभाषण सुरू होते. या घटनेमुळे रुखसार प्रचंड दहशतीखाली आहे. याची ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. केस मागे घे. केस करून काही होणार नाही असं तन्वीर आपल्या पत्नीला सांगत होता. मी जेलमध्ये जाणे तुला आवडलं आहे का असा प्रश्न ही तो तिला करताना दिसत आहे.
जेल किंवा जेल परिसरात गुन्हेगारांनी मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. असं असताना तन्वीरकडे मोबाईल आलाच कसा, हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे रुखसारची मानसिक स्थिती खालावली असून, तन्वीर बाहेर आल्यावर आपल्यावर पुन्हा हल्ला करेल अशी भीती तिला वाटत आहे. आता पोलीस या प्रकरणात मोबाईल पुरवणाऱ्याचा शोध घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेनं पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलीस याबाबत काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world