Kalyan Crime News : राज्यात अनेक ठिकाणी लूटमार करून दहशत माजवणाऱ्या सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी या सराईत चोरट्याला कल्याण जवळच्या आंबिवलीतील इराणी वस्तीतून फिल्मी स्टाईलने अटक करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी ओळख पटवलेल्या या आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आले. विशेष म्हणजे, आरोपीला पकडण्याचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, यावेळी सलमानच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला करून त्याला सोडवण्याचा प्रयत्नही केला.
नेमकं काय घडलं?
पनवेल शहरात नुकत्याच घडलेल्या एका सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर, पनवेल पोलिसांनी तपास करून आरोपीची ओळख पटवली. हा आरोपी म्हणजे कल्याणमधील आंबिवली येथील इराणी वस्तीत राहणारा सलमान इराणी आहे, अशी माहिती समोर आली.
त्यानुसार, पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला. खडकपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय गायकवाड यांचे पथक आणि पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक संयुक्तपणे सलमानला पकडण्यासाठी आंबिवलीतील इराणी वस्तीत रवाना झाले.
( नक्की वाचा : CCTV Video: अंबरनाथमध्ये थरार! लोकल येत असताना ट्रॅकवर उडी घेणाऱ्या चेन स्नॅचरला GRP-RPF ने पाठलाग करत पकडले )
अटकेचा थरार आणि पोलिसांवर हल्ला
पनवेल शहर पोलीस रेल्वे फाटकाजवळ अडकले, मात्र खडकपाडा पोलीस पथक इराणी वस्तीत शिरले. पोलिसांना सलमान इराणी दिसला. पोलिसांनी आधी त्याला न पाहिल्याचे भासवत अचानक त्याच्यावर झडप घातली. सलमानने पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा जोरदार प्रयत्न केला. याच वेळी सलमानचे नातेवाईक तिथे जमले आणि त्यांनी सलमानला सोडवण्यासाठी पोलिसांशी झटापट सुरू केली, तसेच पोलिसांवर हल्लाही केला.
मात्र, पोलिसांनी परिस्थिती हाताळत सलमानला घट्ट पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेचा संपूर्ण थरार व झटापट सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अखेरीस, पोलिसांनी सलमानला ताब्यात घेऊन त्याला पुढील कारवाईसाठी पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये मशिदीबाहेर तुफान राडा; नमाज पठणावरून दोन गट भिडले! 'हे' होतं कारण )
देशभरात हैदोस घालणाऱ्या सराईत गुन्हेगार
सलमान इराणी हा सराईत चोरटा असून, त्याच्याकडून अनेक वर्षांपासून लूटपाट सुरू आहे. त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलीस पथकांवर यापूर्वीही अनेकदा हल्ले झाले आहेत. सलमान इराणीच्या विरोधात पनवेल, भिवंडी, मुंबईसह राज्यभरात आणि देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. तो अनेक प्रकरणांमध्ये फरार होता. त्याच्या अटकेमुळे सोनसाखळी चोरीच्या अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ