Kalyan News : कल्याणमध्ये चार पदरी उड्डाणपुलाच्या कामावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. केडीएमसीत महासभा सुरू असताना बौद्ध समाजातील दोन गट महापालिका मुख्यालयासमोर आमने-सामने आले आहे. दोघांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे मुख्यालय पोलीस छावणीत बदललं आहे. कल्याणमध्ये प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान चार पदरी उड्डाणपूल होणार आहे. याचं काम देखील सुरू झालं आहे. मात्र या भागातील बुद्धभूमी फाउंडेशनकडून या कामाला विरोध केला जात आहे. त्यांनी यासाठी काही मागण्या समोर ठेवल्या आहेत.
बुद्धभूमी फाऊंडेशनच्या मागण्या काय आहेत?
- ३० मे २०२६ रोजी झालेल्या कारवाईत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती बेकायदेशीरित्या हटवणे, बौद्ध स्तूप व भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती बुलडोझर लावून पाडणे, तसेच ४२ झाडांची तोड करण्यात आला आहे. ही कारवाई लाठी व शास्त्रांच्या धाकावर करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तत्काळ निलंबन करावे.
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर ,सहाय्यक आयुक्त सविता हिले त्यांच्यावर गुन्हा नोंदवून निलंबित करावे. तसेच कारवाईत सहभागी ६०-७० जणांची ओळख पटवून अटक करावी.
- विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते प्रेम ऑटो सर्कल दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल बुद्धभूमी परिसराला बाधा न आणता वालधुनी नदीलगत घ्यावा, तसेच बाधित जमिनीचा योग्य मोबदला द्यावा.
- बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र विकसित करून भव्य बुद्ध विहार, विपश्यना केंद्र, शैक्षणिक संकुल, हॉस्पिटल आणि ५० मीटर उंच बुद्ध मूर्ती उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी एक हजार कोटींची निधी मंजूर अधिसूचना काढावी.
भंते गौतम रत्न महाथेरो यांनी स्पष्ट केलं की, केवळ तोंडी आश्वासन देण्याऐवजी राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत लेखी आदेश जारी करावे. जोपर्यंत सरकार लेखी निर्णय देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. यावेळी मोठ्या संख्येने बुद्धभूमीचे अनुयायी उपस्थित होते. यावेळी पालिका व सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. भंते गौतमरत्न महाथेरो यांनी सांगितलं की, जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्यांसंदर्भात अध्यादेश जारी करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी समर्थकांना हे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने यशस्वी करण्याचे आवाहनही केले.
दुसऱ्या गटाच्या आंदोलकांचं काय आहे म्हणणं?
बुद्धभूमी फाउंडेशनच्या भूमिकेविरोधात आंदोलन करणाऱ्या दुसऱ्या गटाचे राम बनसोडे यांनी सांगितलं की, बुद्धभूमी फाउंडेशन संदर्भात प्रशासनाने नेमलेल्या प्राधिकरणा अंतर्गत बुद्धभूमी फाउंडेशनचा विकास व्हायला हवा. ज्यामुळे संपूर्ण परिसराचा विकास होईल. प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठा विकास होणार आहे आणि त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं धर्मक्षेत्र होत आहे. याबाबत भीमराव डोळस यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी मी अण्णासाहेब रोकडे यांनी भंतेजी पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात होतो. त्याला भंतेची स्वतः साक्षीदार आहेत. भंतेजी यांनी त्या कामाला मंजुरी दिली होती. आता ते अडवण्याचं काम करीत आहेत ही एक निंदनीय बाब आहे. यामध्ये भंतेजींचा स्वार्थ असू शकतो असं आम्हाला वाटतं. प्राधिकरणाच्या माध्यमातून होणारा विकास आम्हाला महत्त्वाचा आहे.