Kalyan News : कल्याणजवळच्या मोहने परिसरात फटाके फोडण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत दोन्ही गटांकडून धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉड घेऊन एकमेकांवर हल्ला करण्यात आला, तसेच परिसरातील घरांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी तब्बल 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या मोहने परिसरात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेकडील मोहने परिसरातील एनआरसी गेटजवळ ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण रस्त्यावर फटाके फोडत होता आणि ते फटाके इकडे तिकडे फेकत असल्याने बाजूला असलेल्या फटाक्यांच्या स्टॉलला आग लागण्याची शक्यता होती.
स्टॉलधारकाच्या बहिणीने त्या तरुणाला फटाके न फोडण्यास सांगितले, ज्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादानंतर फटाके फोडणाऱ्या तरुणाने आपल्या काही साथीदारांना बोलावून घेतले आणि त्यांनी स्टॉलधारकाला मारहाण केली, तसेच त्याच्या बहिणीला शिवीगाळ केली.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यावर थरार! कडेवर बाळाला घेऊन महिला फेरीवाल्याने अंगावर डिझेल ओतले; कारण... )
मारहाणीचा नवा व्हिडिओ
यानंतर, स्टॉलधारकाचे समर्थकही जमा झाले आणि त्यांनी फटाके फोडणारा तरुण राहत असलेल्या लहूजी नगर परिसरात प्रवेश करत लोकांना मारहाण केली आणि घरांवर दगडफेक केली. हा राडा जवळपास 2 तास सुरू होता. घटनेची माहिती मिळताच कल्याणचे डीसीपी अतुल झेंजे आणि एसीपी कल्याणजी घेटे रात्रीच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणात दोन्ही गटांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुमारे 60 जणांची ओळख पटली असून, 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका गटाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर मरसाळे यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की, या प्रकरणात आरोपींविरोधात 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल झाला आहे, मात्र जे लोक आरोपी नाहीत, त्यांना नाहक गोवण्यात येऊ नये.
दुसऱ्या बाजूला, आगरी कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी सांगितले की, फटाके फोडण्यास मज्जाव केल्यामुळे स्टॉलधारकास अनेकांनी एकत्रित येऊन मारहाण केली आणि महिलेविषयी अपशब्द वापरले. या मारहाणीचा व्हिडिओ पोलिसांना देण्यात आला आहे. दोषींवर कारवाई करावी, पण ज्यांचा या प्रकरणात काही संबंध नाही, त्यांना आरोपी करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या मोहने परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पाहा मारहाणीचा Video