Kalyan News: नवी मुंबई आणि कल्याण पोलिसांनी मिळून केलेल्या एका धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला हादरा बसला आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत इराणी चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पहाटेच्या अंधारात एक विशेष सापळा रचला होता. या संयुक्त कोंबिंग ऑपरेशनमुळे दोन खतरनाक गुन्हेगार आता पोलिसांच्या कोठडीत आहेत.
पहाते 4.30 वाजता थरार
नवी मुंबईत दरोडा आणि चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेले दोन आरोपी कल्याणमधील आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई आणि खडकपाडा पोलिसांनी मिळून या भागात मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत तब्बल 70 पोलिसांचा ताफा सहभागी झाला होता.
( नक्की वाचा : Titwala News: टिटवाळ्यात 600 कोटींचा 'चाळ झोल';हातोडा पडला, तरी इमारत उभी! वाचा धक्कादायक सत्य )
दोन सराईत गुन्हेगार जेरबंद
पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या राबवलेल्या या मोहिमेत मुसा सय्यद आणि काबुलअली जाफर या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले आहे. हे दोन्ही आरोपी सराईत असून त्यांच्यावर चोरी आणि दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलीस या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आंबिवलीची इराणी वस्ती पुन्हा चर्चेत
कल्याणमधील आंबिवली येथील इराणी वस्ती गुन्हेगारांच्या वास्तव्यासाठी ओळखली जाते. याआधी देखील खडकपाडा पोलिसांनी याच परिसरातून 100 पेक्षा जास्त गुन्हेगारांना अटक करून देशातील विविध पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या ताज्या कारवाईमुळे पुन्हा एकदा या वस्तीतील गुन्हेगारी हालचाली समोर आल्या आहेत. डोंबिवलीतील पालावा परिसरातही संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू ठेवण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Bakrid 2026 : मिरारोडमध्ये बकरा विरुद्ध डुक्कर वाद! पूनम सोसायटीतील त्या घटनेनं वातावरण तापलं! वाचा सर्व अपडेट )
या कारवाईमुळे नवी मुंबई आणि कल्याण परिसरात चोरीच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे