Kalyan News : कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात घडलेल्या ‘पेंद्या भाई' हत्याकांडाचा कल्याण गुन्हे शाखेने अवघ्या 36 तासांत छडा लावला आहे. अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई याची प्रेयसीसमोरच 16 वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.
प्रेयसीसमोर पेंद्याभाईचा The End...
हल्लेखोरांनी त्याच्या प्रेयसीवरही चाकूने वार करत गंभीर जखमी केले होते. या हत्याकांडानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी पेंद्याभाई जामिनावर बाहेर आला होता. चार महिन्यात त्याचं लग्न होणार होतं. लग्नाआधीच पेंद्याभाईचा खेळ खल्लास करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-03 ने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून गुप्त माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली. अविनाश लल्लन झा, कल्पेश मढवी आणि करण गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.