अमजद खान
दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच त्याचा साथीदारांसोबत एका सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलिसांनी तीन तासाच्या आत शहापूर येथून लहान मुलाची सुटका केली. शिवाय दोन आरोपींना ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणात एकूण पाच आरोपी असल्याचे समोर आले आहे. वॉट्सअप लिंकद्वारे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याबाबतची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. त्यानंतर चिमुकल्याचा पोलिसांनी शोध घेतला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरातील व्यावसायिक महेश भोईर यांचा मुलगा कैवल्य भोईर हा शाळेसाठी घरातून सकाळी निघाला. रिक्षा चालक विरेन पाटील याने महेश भोईर यांना माहिती दिली की, कैवल्य याला काही लोक पळवून घेऊन गेले आहेत. ते कोण होते हे मला माहिती नाही. थोड्याच वेळात महेश भोईर यांच्या वॉट्सअपवर कॉल आला. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. मुलगा हवा असल्यास दोन कोटी रुपये द्या. याची माहिती महेश यांनी लगेचच मानपाडा पोलिसांना दिली.
डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांनी पोलिस निरिक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड यांच्या नेतृत्वात चार तपास पथके तयार केली. मुलाचा शोध सुरु झाला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलगा कैवल्य याला शहापूरातून शोधून काढले. पोलिसांना रिक्षा चालक विरेन पाटीलवर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांचा खाक्या दाखविला असता त्याने अपहरणात आपण सहभागी असल्याची कबूली त्यांनी दिली.
अपहरण करणारे कोण आहे हे कैवल्य ओळखत नव्हात पण चौकशी मध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. या अपहरणात विरेन पाटील, संजय मढवी आणि अन्य तीन अल्पवयीन मुले सहभागी होती. सध्या संजय मढवी आणि विरेन पाटील यांना अटक करण्यात आली आहे. अन्य तीन आरोपींचा शोध सुरु आहे. तीन तासाच्या आत पोसिसांनी मुलाची सुटका केल्याने त्याचा जीव वाचला. ज्या प्रकारे खंडणी मागितली जात होती. मुलासोबत काहीही अनुचित प्रकार घडू शकला असता. त्या पूर्वीच पोलिसांनी अपहरणचा छडा लावला. डोंबिवलीत काही वर्षापूर्वी शाळकरी मुलांचे अपहरण करुन त्यांच्या हत्या केल्याच्या घडना घडल्या हेात्या.