अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan News : कधी कल्याण कोर्टात ड्यूटी तर कधी कुलाबा क्राईम ब्रँचमध्ये ड्यूटी, स्वत:ला पोलिस अधिकारी असल्याचं भासवत त्यानं एका तरुणीला प्रभावित केले. दोघांचे लग्न ठरले. पण, हुशार तरुणीला काहीतरी गोलमाल असल्याचा संशय आला. त्यानंतर तिनंच त्या भामट्याचं बिंग फोडलं. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. निलेश चव्हाण असे या भामट्या पोलिसाचे नाव आहे. त्याने आत्तापर्यंत अन्य किती तरुणींसोबत असा प्रकार केला आहे याचा तपास पोलिस करीत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कल्याणमध्ये एका कन्सल्टींग कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीची निलेश चव्हाण या तरुणासोबत ओळख झाली. निलेशनं तो सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे सांगितले होते. त्यानं सुरुवातीला आपली ड्यूटी कल्याण कोर्टात आहे, असं सांगितलं. त्यानंतर मी कुलाबा क्राईम ब्रँचला पोलीस अधिकारी आहे, अशी थाप मारली. फोनवर बोलून निलेशनं काही दिवस तरुणीकडून पैसेही घेतले. त्या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं.
एके दिवशी निलेशनं लग्नाच्या साखरपुड्यासाठी अंगठी हवी आहे, असं सांगत तरुणीकडून महागडी अंगठी घेतली. अंगठी घेतल्यावर तरुणीला शंका आली. त्या तरुणीनं हा सर्व प्रकार तिच्या कार्यालयात काम करणाऱ्या किशोर पात्रा या सहकाऱ्याला सांगितला. किशोरने निलेश चव्हाणबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी निलेश चव्हाण नावाचा असा कोणताही पोलिस कुठेही कामाला नाही, हे उघड झालं.
( नक्की वाचा : Dombivli : 'दुकान आणि हॉटेल व्यावसायिकांनी मुस्लिमांना कामावर ठेवू नये,' भाजपाचा इशारा, राजकारण तापले! )
तरुणीने याची माहिती पोलिसांना दिली. 25 दिवस निलेश तरुणीच्या संपर्कात नव्हता. शुक्रवारी तरुणीला त्याचा फोन आला. त्यानंतर तरुणीने त्याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली. तरुणीने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. तोपर्यंत पोलिस त्याच्याजवळ पोचले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
निलेशने सातारामध्ये राहत असल्याचे सांगितले होते. मात्र तो ठाण्यात राहत होता. निलेशच्या अटकेनंतर पुढील तपास सुरु केला आहे. त्याने अन्य किती तरुणींनी अशा प्रकारे गंडा घातला आहे याचा तपास पोलीस करत आहेत.