Kalyan Police : कल्याण पोलिसांच्या ‘नशा विरोधी मोहिमे'अंतर्गत गांजा तस्करांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दाट जंगलात नेटवर्क नसतानाही, वॉकी टॉकी आणि अत्याधुनिक हत्यारे बाळगणाऱ्या चार कुख्यात गांजा तस्करांना विशाखापट्टणमच्या जंगलातून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल 72 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कल्याण पोलीस परिमंडळ 3 ची ही सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे. गेल्या 22 दिवसांपासून पोलीस ठाणे, मुंबई, पुणे, सोलापूर आणि विशाखापट्टणम येथे छापे टाकत होते. या मोहिमेमुळे गांजा तस्करीचे आंतरराज्यीय रॅकेट उद्धवस्त झाले आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत डीसीपी अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे उपस्थित होते.
डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. पोलीस अधिकारी विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने सोलापूर येथे छापा टाकला, तर दुसरे पथक पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली थेट विशाखापट्टणमच्या जंगलात पोहोचले.
( नक्की वाचा : Love Story : '15 दिवस नवऱ्यासोबत, 15 दिवस प्रियकरासोबत...' 10 वेळा पळून गेलेल्या विवाहितेची अजब मागणी )
यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. विशाखापट्टणमच्या घनदाट जंगलात मोबाईल नेटवर्क काम करत नव्हते, त्यामुळे तस्कर वॉकी टॉकीचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्याकडे पोलिसांवर हल्ला करण्यासाठी अत्याधुनिक हत्यारेही होती.
या आव्हानात्मक परिस्थितीत, पोलिसांनी सापळा रचून योग्य वेळ आणि ठिकाण निश्चित केले. आरोपींकडून कोणताही प्रतिहल्ला होणार नाही याची खात्री करत, पोलिसांनी एकाच वेळी चारही तस्करांवर झडप घातली आणि त्यांना अटक केली.
या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या एकूण 13 आरोपींची नावे अशी आहेत: बाबर शेख, गुफरान शेख, सुनिल राठोड, आझाद शेख, रेश्मा शेख, सुभम भंडारी, सोनू सय्यद, आसिफ शेख, प्रथमेश नलावडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिताडे, आणि योगेश जोध.
या कारवाईत पोलिसांनी एकूण 72 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याआधीही डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली येथे जवळपास ४ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, ज्यात सात जणांना अटक करण्यात आली होती.