जाहिरात

Kalyan: 80 जणांना चावा, खंडणीची मागणी अन् कुत्र्याची हत्या! कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीत नेमकं चाललंय काय?

Kalyan News: कल्याणमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून, प्राणी मित्र आणि रहिवासी यांच्यातील वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.

Kalyan: 80 जणांना चावा, खंडणीची मागणी अन् कुत्र्याची हत्या! कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीत नेमकं चाललंय काय?
Kalyan News: कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीमधील वाद आणखी चिघळलाय. (प्रतिकात्मक फोटो)
कल्याण:

Kalyan News: कल्याणमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून, प्राणी मित्र आणि रहिवासी यांच्यातील वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. कुत्र्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी प्राणी मित्रांवर खंडणीचा आरोप केला असतानाच, आता एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याने खडकपाडा पोलिसांनी रहिवाशांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या दुहेरी गुन्ह्यांमुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून हा वाद आगामी काळात अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

सोसायटीमध्ये दहशतीचे वातावरण

कल्याणमधील वाधवा मेडोज या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुत्र्यांनी आतापर्यंत तब्बल 80 जणांना चावा घेतला असून यामध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. 

वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी रहिवाशांनी प्राणी मित्रांची मदत घेण्याचे ठरवले, मात्र तिथेच वादाची पहिली ठिणगी पडली.

( नक्की वाचा : Kalyan News: 'भटके कुत्रे नको असतील तर दर महिना 16000 द्या', प्राणी मित्रांनी मागितली खंडणी! कल्याणमधील प्रकार )

प्राणी मित्रांवर खंडणीचा आरोप

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हिर राजपूत आणि रत्ना पुरोहित या दोन प्राणी मित्रांना रहिवाशांनी विनंती केली होती. मात्र, या कुत्र्यांना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या दोघींनी रहिवाशांकडे दरमहा 16000 रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्याचा आडोसा घेऊन पैशांची मागणी केल्याने रहिवाशांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत दोन्ही प्राणी मित्रांच्या विरोधात खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

कुत्र्याचा मृत्यू आणि रहिवाशांविरोधात कारवाई

एकीकडे खंडणीचा गुन्हा दाखल झालेला असतानाच, सोसायटीमध्ये एका भटक्या कुत्र्याला मारून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राणी मित्रांनी केलेल्या आरोपांनुसार, सोसायटीतील काही लोकांनी रागाच्या भरात कुत्र्याचा जीव घेतला आहे. या तक्रारीच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार सोसायटीतील एका अज्ञात रहिवाशाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. एकाच सोसायटीमध्ये प्राणी मित्र आणि रहिवासी या दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल झाल्याने हे प्रकरण आता कायदेशीर गुंतागुंतीचे बनले आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीतील प्रसिद्ध शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाकडून शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी;शहरात संताप )

खडकपाडा पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवरून कुत्र्याला मारणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे, खंडणीच्या आरोपांबाबतही सखोल चौकशी केली जात आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि प्राण्यांचे हक्क या दोन टोकाच्या भूमिकांमुळे हा सामाजिक वाद आता पोलीस दप्तरी पोहोचला असून, कल्याणमधील या हाय प्रोफाईल सोसायटीतील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com