Kalyan News : ती तो अन् तंबाखू, KDMC समोर राडा; निर्दोष तरुणाला भयंकर मारहाण, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

Kalyan News : कल्याणमधील केडीएमसी मुख्यालयासमोर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका साध्या वादातून निष्पाप तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News : हा सर्व प्रकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घडत होता.
कल्याण:

Kalyan News : कल्याणमधील केडीएमसी मुख्यालयासमोर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका साध्या वादातून निष्पाप तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. भररस्त्यात हा सगळा राडा सुरू असताना महापालिकेचे सुरक्षा रक्षक मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत तमाशा पाहत उभे होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामध्ये मध्यस्थी करणाऱ्या पत्रकारांनाही धमकावण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याणच्या केडीएमसी मुख्यालयासमोरून जात असताना कुणाल साळवे नावाच्या तरुणाकडे एका व्यक्तीने तंबाखू मागितली. कुणालने त्याला तंबाखू दिली, मात्र याच दरम्यान कुणालच्या मित्राचा हात रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणीला लागला. यावरून त्या तरुणीने छेडछाडीचा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर गोंधळात झाले आणि तिथे बघ्यांची गर्दी जमली. 

Advertisement

तरुणीने तिच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांना बोलावून घेतले, पण काही वेळाने तिने आपली कोणाबद्दल तक्रार नसल्याचे सांगून तिथून निघून जाणे पसंत केले. ज्या तरुणावर छेडछाडीचा आरोप होता, तो तरुणही तिथून निघून गेला. मात्र, संतापलेल्या तरुणीच्या सहकाऱ्यांनी कुणाल साळवे याला गाठले आणि ज्याचा कोणताही दोष नव्हता, त्या कुणालला जवळपास 2 तास बेदम मारहाण केली.

( नक्की वाचा : 7/12 Fraud : महसूल विभागात खळबळ! दीड लाख शेतकऱ्यांचा 7/12 धोक्यात; मंत्र्यांनीच दिली घोटाळ्याची कबुली )

सुरक्षा रक्षकांची बघ्यांची भूमिका

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घडत होता. पालिका मुख्यालयाची सुरक्षा करण्यासाठी तैनात असलेले सुरक्षा रक्षक हा सर्व तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत होते. एका तरुणाला बेदम मारले जात असताना त्यांनी ना मध्यस्थी केली, ना पोलिसांना फोन करण्याची तसदी घेतली. सुरक्षा रक्षकांच्या या अजब भूमिकेमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. शेवटी काही सुज्ञ नागरिकांनी पुढाकार घेऊन कुणालला त्या मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सोडवले.

पत्रकारांना धमकी आणि पोलिसांची कारवाई

या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या काही पत्रकारांनाही मारहाण करणाऱ्या तरुणांनी धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी तातडीने हालचाली करत मारहाण करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतले आहे. 

संबंधित तरुणीनेही पोलीस ठाण्यात जाऊन आपली बाजू मांडली आहे. छेडछाड झाली असेल तर दोषीवर कारवाई होणे अपेक्षित आहे, पण ज्याचा काहीही संबंध नाही अशा व्यक्तीला कायद्या हातात घेऊन मारहाण करण्याचा अधिकार या सहकाऱ्यांना कोणी दिला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. बाजारपेठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article