जाहिरात
This Article is From Aug 22, 2024

VIDEO: 'किमान हसू तरी नका', कोलकाता हत्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान कपिल सिब्बलांना कुणी सुनावलं?

VIDEO: 'किमान हसू तरी नका', कोलकाता हत्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान कपिल सिब्बलांना कुणी सुनावलं?
नवी दिल्ली:

कोलकातामधील महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात आज (गुरुवार, 22 ऑगस्ट) सुनावणी झाली. या प्रकरणात पश्चिम बंगलाचे सरकारकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही युक्तीवाद सादर केला. या सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकार, राज्य पोलीस आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्यावर अनेक प्रश्न विचारले. कोर्टात ही सुनावणी सुरु असताना अतिशय गंभीर वातावरण होतं. त्यावेळी कपिल सिब्बल हसले. त्यांच्या या कृतीचेही कोर्टात पडसाद उमटले.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान सॉलिसिटर जनरल मेहता यांनी केस डायरीचा हवाला दिला. पोलिसांना माहिती केव्हा देण्यात आली. त्यांनी या प्रकरणात कसा निष्काळजीपणा केला हे मेहता कोर्टात सांगत असताना कपिल सिब्बल हसत होते. सिब्बल हसत असलेले पाहून सॉलिसिटर जनरल चिडले. 'एकानं त्याचा जीव गमावला आहे, तुम्ही किमान हसू तरी नका', असं मेहता यांनी सिब्बल यांना सुनावलं. 

सीबीआयकडून धक्कादायक गौप्यस्फोट 

सीबीआयनं या सुनावणीच्या दरम्यान स्टेटस रिपोर्ट सादर केला. त्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात हॉस्पिटल प्रशासनाचे धोरण संशयास्पद आहे, असं सीबीआयनं म्हंटलं आहे.

( नक्की वाचा : Kolkata Doctor Murder : काय होतं पीडित डॉक्टरचं स्वप्न? कसं हवं होतं आयुष्य? डायरीमधून झाला उलगडा )
 

पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती बरीच उशीरा देण्यात आली. कुटुंबीयांना पीडिता पहिल्यांदा आजारी असल्याचं आणि नंतर तिनं आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. त्याचबरोबर क्राईम सीन देखील बदलण्यात आला आहे. हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं स्पष्ट दिसत आहे, असा दावा सीबीआयनं कोर्टात केला.