रात्रीच्या वेळी निर्मनुष्य रस्त्यावर एक कार येते. ती रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला धडकते. दोन्ही कारमधून काही जण बाहेर पडतात. ते एकमेकांवर हल्ला करतात. त्यांच्या हातामध्ये काय आहे? ते एकमेकांवर काय टाकत आहेत हे समजत नाही. पण, दोन्ही गट एकमेकांचा जीव घेण्यासाठी आतुर आहेत, हे दिसतंय. हे काही चित्रपटातलं शूटिंग नाही तर एका गँगवारचा व्हिडिओ आहे. कर्नाटकमध्ये गुंडांचं धाडस किती वाढलंय हे या व्हिडिओतून (Karnataka Gangwar) स्पष्ट होतंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भर रस्त्यात गँगवॉर
या व्हिडिओनुसार अचानक एका कारमधून काही जण बाहेर पडतात. ते एकमेकांवर हल्ला करु लागतात. कार रस्त्यावर वेगानं फिरत असते. दुसऱ्या गँगच्या सदस्याला धडकून ती पुढं जाते. कारची धडक लागल्यानं ती व्यक्ती रस्त्यावर जखमी होऊन पडल्याचं फुटेजमध्ये दिसतं. ती व्यक्ती काहीही हलचाल करत नाही. जखमी व्यक्तीला तिथंच सोडून कार रस्त्यावरुन पुढं जाते. रस्त्यावर उभी असलेल्या लोकांचा एकमेकांवर हल्ला सुरुच असतो. त्याचवेळी दुसरी कार जखमी व्यक्तीला आतमध्ये घेऊन पुढं जाते.
( नक्की वाचा : नातवाला वाचवायला आजोबांनी केला होता प्लॅन, पुणे पोलिसांचा गौप्यस्फोट )
गँगवॉरचा हा व्हिडिओ 18 मे चा असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उडूपी आणि मणिपालमधील राष्ट्रीय महामार्गावरचा हा व्हिडिओ आहे. गुंडांनी कार रस्त्यावरच उभी केली होती. ते एकमेकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते. कर्नाटकच्या कायदा आणि सूव्यवस्थेची पोलखोल करणारा हा व्हिडिएओ भाजपानं शेअर केलाय. 'कर्नाटक मॉडल' असं भाजपानं या गँगवॉरचं वर्णन केलं आहे.
'काँग्रेसचं कर्नाटक मॉडेल'
भाजपानं हा व्हिडिओ पोस्ट करत कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केलीय. मुलींवर बलात्कार, हल्ले, हत्या, बॉम्ब स्फोट, गांजा, अफू, रेव्ह पार्टी, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा या कर्नाटकातल्या काँग्रेस प्रशासनातील सामान्य गोष्टी आहेत. कर्नाटकचं हे मॉडल काँग्रेस देशाला दाखवत आहे, अशी टीका भाजपानं केलीय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही भाजपानं या पोस्टमध्ये टॅग केलंय.