प्रतीक्षा पारखी, प्रतिनिधी
पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये पोर्शे गाडीनं उडवल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला. ही पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आज (शनिवार, 25 मे ) केलेल्या कारवाईत त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवालला अटक करण्यात आली आहे. या अपघात प्रकरणातून नातवाला वाचवण्यासाठी सुरेंद्रकुमार यांनी पूर्ण योजना बनवली होती असा गौप्यस्फोट पुणे पोलिसांनी केला आहे. सुरेंद्रकुमारला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद सुरेंद्रकुमार अग्रवालच्या या प्रकरणातील सहभागावर प्रकाश टाकला. अग्रवाल यांनी या अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी पोर्शे कारच्या ड्रायव्हरवर दबाव टाकला होता, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
( नक्की वाचा : विशाल अग्रवालच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार चिडून म्हणाले... )
पोर्शे कारच्या ड्रायव्हरला पोलिसांनी चौकशी करुन सोडल्यानंतर अग्रवालनी त्याला स्वत:च्या घरी नेलं. त्याचा फोन जप्त केला. त्याला पैशाचे आमिष दाखवले. कुणाशीही संपर्क करायचा नाही असं सांगून डांबून ठेवण्यात आलं. ड्रायव्हर रात्रभर घरी आला नाही म्हणून त्याच्या घरचे अग्रवालच्या घरी पोहोचले. ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचं कळताच त्यांच्या घरच्यांनी आरडाओरडा केला, त्यानंतर त्याला सोडलं अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
सुरेंद्रकुमार अग्रवालच्या दबावामुळेच ड्रायव्हरनं चुकीचा जबाबद दिला. पण, पोलिसांकडं अल्पवयीन मुलानंच वाहन चालवल्याचे पुरावे होते. पोलिसांच्या चौकशीच्या दरम्यान ड्रायव्हर खूप घाबरला होता. दोन दिवस त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्यानं कबुली दिली. ड्राइव्हरला ज्या रूम मधे डांबून ठेवलं त्याचं पंचनामा करण्याचं काम सुरु आहे. त्याच्यावर दबावतंत्र वापरण्यात आलं. पैशांचं आमिष दाखवलं गेलं त्याचा त्याला धक्का बसलाय, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : 1 तास TV, 2 तास गेम : रिमांड होममध्ये असा जाणार बिल्डरपुत्राचा दिवस, काय मिळणार खायला? )
विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील सर्व सहा आरोपींना शुक्रवारी (24 मे) न्यायालयात हजर करण्यात आलं. सर्वांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवाल ( मुलाचे वडील) प्रल्हाद भुतडा ( कोझी हॉटेलचा मालक), सचिन काटकर ( कोझी हॉटेलचा व्यवस्थापक), संदीप सांगळे ( ब्लॅक बारचा मालक), नितेश शेवाणी (हॉटेल कर्मचारी) आणि जयेश गावकर (हॉटेल कर्मचारी) या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world