मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या जारगाव येथे खुशाल भदाणे या तरुणाने कौटुंबिक वादातून पत्नी प्रियंका भदाणे हिची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा तरुण इथवरच थांबला नाही तर पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दरम्यान पत्नीच्या आक्रोशामुळे ग्रामस्थांनी भदाणेच्या घराच्या दिशेला धाव घेतली होती. त्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचा जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र पत्नीचा गळा चिरल्याने प्रियंका भदाणे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच साडेपाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे जारगावमध्ये खळबळ उडाली असून संपूर्ण गाव हादरलं आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून महिलेचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवला असून हत्या करणारा तरुण खुशाल भदाणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा - Live-in partner murder : लिव्ह-इन-पार्टनरची हत्या, तैनात असलेल्या पोलीस ठाण्यात दिली कबुली; हैराण करणारा गुन्हा
खुशाल भदाणे आणि प्रियंका भदाणे हे पती-पत्नी मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या निंभोरा या गावातील रहिवासी होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ते जारगाव येथे वास्तव्यास आले. खुशाल भदाणे हा तरुण मिस्त्रीचे काम करत करायचा. मात्र पती-पत्नीमध्ये कायम वाद होत होता. चारित्राच्या संशयावरून हा वाद असल्याने स्वत:चं गाव सोडून ते 2 महिन्यांपूर्वी जारगावमध्ये राहायला आले होते आणि याच संशयावरून तरुणाने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचोरा पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.