विशाल पुजारी, कोल्हापूर: कोल्हापूरमधील सिद्धार्थनगर परिसरात मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड, लाईट्सचे स्ट्रक्चर उभे करण्यावरून दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. या राड्यातून जोरदार दगडफेकही करण्यात आली. दोन गटांतील या धुमश्चक्रीत काहीजण जखमी तर मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. या राड्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील सिद्धार्थनगर परिसरात रात्री दोन समाजात वाद झाला. उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड, लाईट्सचे स्ट्रक्चर उभे करण्यावरून निर्माण झालेल्या वादातून दगडफेकीत आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन गटांतील या धुमश्चक्रीत काहीजण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सुमारे तासभर दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक सुरू झाल्याने या परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलीस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिसांनी बंदोबस्तात ही धुमश्चक्री रोखली. सध्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले असून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे.