
विशाल पुजारी, कोल्हापूर: बसमध्ये अल्पवयीन मुलाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील किणी येथे ही घटना घडली. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून आत्महत्या केलेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी गावात निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. या घटनेची पेठवडगाव पोलिसात नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील किणी या गावातील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. महाविद्यालयातून येत असताना बसमध्ये होत असलेल्या त्रासाला कंटाळून या तरुणीने आपलं जीवन संपवलं. पेठ वडगाव पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. संबंधित अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर रात्री उशिरा अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर संबंधित मुलाला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं. सध्या या मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
Whale Ambergris : दापोलीत 5.45 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, वाचा काय आहे प्रकरण?
आईला सगळा प्रकार सांगितल्यानंतर मुलीनं तुळईला गळफास घेऊन जीवन संपवलं
मृत तरुणी ही पेठवडगाव येथील एका महाविद्यालयात शिकत होती. एक अल्पवयीन मुलगा या मुलीला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. 13 ऑगस्ट रोजी सुद्धा या मुलांनी बसमध्ये बसल्यानंतर त्रास देण्यास सुरुवात केली. बसमध्ये मुलीच्या शेजारी बसून तो तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असायचा. मृत तरुणीने या मुलासोबत बोलण्याची टाळाटाळ देखील केलेली.
पण तरी देखील हा मुलगा त्रास देत होता. पीडित मृत तरुणीने दुपारी घरी गेल्यानंतर आईला हा सगळा प्रकार सांगितला. आईने ऐकून घेतल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यातून तक्रार देऊन घरी परतण्याआधीच मुलीने घरातील तुळईला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलेलं होतं. त्यानंतर संबंधित घटनेची पोलिसात माहिती देण्यात आली. या मुलीची नवे पारगाव या रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
आई-वडिलांनी मजुरी करून मुलीला पोलीस बनवण्याचे स्वप्न पाहिलेलं
पीडित मृत तरुणीचं पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होतं. आई-वडिलांनी मोलमजुरी करून तिला शिकवलेलं होतं. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच तिने पोलीस अधिकारी बनण्याची धडपड सुरू केलेली. पण हे स्वप्न आता अधुरं राहिला आहे. कुटुंबीयांकडूनही तिच्या मृत्यूनंतर मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आज आमची मुलगी आम्हाला मुकली आम्ही पोरके झालो अशा प्रतिक्रिया घरच्यांच्या आहेत.
ग्रामस्थांनी या मुलीच्या मृत्यूनंतर गावात कॅण्डल मार्च काढला. कॅन्डल मार्च मधून मुलीला श्रद्धांजली वाहिण्यात आली. गावातल्या तरुणीबाबत घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. श्रद्धांजली वाहिल्यानंतर ग्रामस्थांकडून या मुलीला आणि घरच्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करू असा निर्धार करण्यात आला.
(नक्की वाचा : FASTag Annual Pass: महाराष्ट्रात कुठे कुठे चालणार फास्टॅग वार्षिक पास? वाचा 'त्या' 96 टोलनाक्यांची यादी )
एका तरुणीच्या बाबतीत एक महिना पूर्ण होत नाही तोपर्यंतच कोल्हापुरात घडलेली ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर एका महाविद्यालयीन तरुणीचा हुल्लडबाज तरुणांनी चालवलेल्या भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झालेला. भोगावती महाविद्यालयाच्या तरुणी बसस्टॉप वर थांबल्या असताना या तरुणांनी स्टंटबाजी करत हुशारकी गाजवण्याचा प्रयत्न केला.
हे तरुण देखील या परिसरात वारंवार मुलींना त्रास देत होते. यातूनच मोठा अपघात घडला आणि तरुणीचा हकनाक बळी गेला. घटना ताजी असतानाच आता किनी या गावातल्या मुलीवर बस मध्येच त्रास देत असलेल्या मुलामुळं आत्महत्या करण्याची वेळ आली. सार्वजनिक ठिकाणी घडत असलेल्या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत आहे. प्रशासनाकडून नेमक्या कोणत्या खबरदारी घेतल्या जातात असे प्रश्न उपस्थित होत आहेत. निर्भया पथकांचा धाक राहिलेला नाहीये का असे प्रश्न देखील विचारले जात आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world