जाहिरात

Korean Game : गेम नव्हे, तर ‘डेथ ट्रॅप'; पालकांसाठी धोक्याचा इशारा

Korean Game Uttar Pradesh : कोरियन गेम्सचा विळखा संस्कारक्षम वयात काही कळण्यापूर्वीच मेंदूचा ताबा घेत आहे.

Korean Game : गेम नव्हे, तर ‘डेथ ट्रॅप'; पालकांसाठी धोक्याचा इशारा

Korean Game Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये तीन बहिणींच्या आत्महत्येच्या घटनेला आता एक नवीन वळण मिळाले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, बहिणींपैकी एक मुलगी बाल्कनीतून उडी मारण्यावर ठाम होती, तर इतर दोघी तिला वाचवण्याचा आणि रोखण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु या प्रयत्नात तिन्ही बहिणी बाल्कनीतून खाली कोसळल्या.

ही घटना बुधवारी पहाटे २:१५ च्या सुमारास 'भारत सिटी' सोसायटीमध्ये घडली. पाखी (१२), प्राची (१४) आणि विशिका (१६) या तिन्ही सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारली.

निव्वळ गेम नव्हे, हा तर ‘डेथ ट्रॅप'

सध्या कोरियन एनिमे पुस्तके, कोरियन पॉप संगीत यांचे भलतेच फॅड जगभर पसरले आहे. त्यातच कोरियन गेम्सचा विळखा संस्कारक्षम वयात काही कळण्यापूर्वीच मेंदूचा ताबा घेत आहे. चायनिज गेम्सवर बंदी घातली तर ते देखील नाव बदलून बाजारात येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेमिंग आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ श्रीकांत अर्धापूरकर यांच्या अनुसार, ऑनलाईन गेम हा डेथ ट्रॅप होऊ शकतो, AR(augmented reality) Vr (virtual reality) या latest technology मुळे तसेच हाय ग्राफिक्समुळे गेम वास्तववादी वाटतात. यामुळे आपण गेम मधले एक प्लेयरची असल्याची भावना निर्माण होते. या गेममध्ये दुसरं कोणी नाही तर आपणच यश-अपयशाचा सामना करीत असल्याचं वाटतं.

कोरियन गेम्स बद्दल ते म्हणतात, कोरियन गेम, चायनीज गेम किंवा अमेरिकन गेम हे टास्कवर आधारित गेम असतात. यात real life सोबत task देतात. हा गेम इतका रियल वाटतो की, AR/Vr Technology मुळे आपण त्याला दिवसातील प्रत्येक क्रियांशी जोडतो. प्रत्येक टास्कसोबत आव्हान वाढते. बऱ्याचदा टास्क पूर्ण करायला क्रेडिट विकत घ्यावे लागतात. यावर बऱ्याचदा आर्थिक ताणदेखील येतो. जेव्हा यश-अपयश आणि आर्थिक गुंतवणूक असते तेव्हा सुसाइडसारखा अपरिहार्य पर्याय शिल्लक राहतो.

नक्की वाचा - Online Game: 'आम्ही भारतीय नाही, कोरियन आहोत!' 3 सख्ख्या बहिणींच्या मृत्यूचं कारण ठरलेला तो गेम आहे तरी काय?

पालकांनी अधिक काळजी घ्या...

सायबर सुरक्षा जागरुकतेकरिता शाळा आणि महाविद्यालयीन मुलांचे आणि पालकांचे वर्कशॉप घेणाऱ्या ऐश्वर्या तिवारी म्हणतात, अशा घटना समाजासाठी धोक्याच्या घटना आहेत. गाझियाबादमधील घटनेनंतर पालकांनी आपल्या मुला-मुलींकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मुलांसोबत मित्रत्वाचे नाते निर्माण करायला हवेत. त्यांच्याशी गप्पा मारा आणि मुलांच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लहान मुलं मोबाइल किंवा स्क्रीनवर किती वेळ घालवतात, नेमके काय बघतात ते आपल्यासोबत देखील शेअर करत असतील, निदान मनमोकळे सांगत असतील तरी त्यांच्याशी आपली मैत्री कितपत घट्ट आहे, हे समजून येईल. फक्त मोबाइल हिसकावून घेणे हा केवळ पर्याय नाही. डिजिटल फास्टिंगमध्ये सुद्धा गंमत आहे, हे त्यांनी समजून घेण्यात आपल्यालाच मदत करावी लागणार आहे. गरज लागली तर मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यास मुळीच संकोच नको.

नेमकं काय घडलं?

एका प्रत्यक्षदर्शीनुसार, ".. दुसरी मुलगी आली आणि तिने रेलिंगवर बसलेल्या मुलीला खाली खेचलं. ती बहिणीला रोखण्यात यशस्वी झाली होती. मात्र, काही मिनिटांनंतर मुलगी पुन्हा रेलिंगवर चढली. यावेळी एक लहान मुलगी तिथे आली आणि तिने रेलिंगवर बसलेल्या मुलीला घट्ट मिठी मारली. मी फोन काढून कोणाला तरी माहिती देण्यापूर्वीच, तिन्ही मुली बाल्कनीतून खाली कोसळल्या. एक मुलगी उडी मारण्यावर ठाम होती आणि इतर दोघी तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र यामध्ये दोघीही खाली पडल्या. यात डोक्याला जबर मार लागून तिघींचाही मृत्यू झाला.

पोलिसांना घटनास्थळी ८ पानांची एक सुसाईड नोट आणि डायरी सापडली आहे. त्यात लिहिलं होतं... "या डायरीत जे काही लिहिलं आहे ते सर्व वाचा. कारण ते सर्व सत्य आहे. आय एम रियली सॉरी. सॉरी, पापा." या नोटच्या शेवटी रडणारा इमोजी (Emoji) काढलेला होता.

मुलींच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही बहिणींना कोरियन संस्कृती आणि ऑनलाइन गेम्सचे प्रचंड वेड होते. त्यांनी स्वतःची 'कोरियन नावे' देखील ठेवली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले होते की, "कोरिया हेच आमचे जीवन आहे आणि आमचे सर्वात मोठे प्रेम आहे, आम्ही ते सोडू शकत नाही." मुलींनी गेल्या दोन वर्षांपासून शाळेत जाणे बंद केले होते आणि त्या दिवसभर वडिलांच्या मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळत असत. पालकांनी त्यांच्या मोबाईल वापरावर निर्बंध घातल्यामुळे त्या नैराश्यात होत्या, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com