Navi Mumbai: ऑनलाइन गेम्स खेळून कोट्यवधी रुपये कमावण्याचे आमिष किती महागात पडू शकते, याचे एक उदाहरण नवी मुंबईत समोर आले आहे. ऑनलाईन गेमिंगमधून प्रचंड आर्थिक परतावा मिळवण्याच्या नादात एका 25 वर्षीय तरुण रिक्षाचालकाची तब्बल 1 कोटी 26 लाख 86 हजार 778 रुपयांची फसवणूक झाली आहे. या मोठ्या सायबर फ्रॉडप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2 वर्षांपासून सुरू होता फसवणुकीचा खेळ
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश आनंता पाटील (वय 25) हे मोरावे (सेक्टर-3, नवी मुंबई) येथे राहतात आणि रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, 29 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2026 या दोन वर्षांच्या कालावधीत सायबर भामट्यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. आरोपींनी आदेश यांना "KheloStar" हा ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म पूर्णपणे वैध, सूचीबद्ध आणि विश्वासार्ह कंपनी असल्याचा खोटा विश्वास दिला. या आमिषाला बळी पडून आदेश यांनी संबंधित वेबसाइटवर नोंदणी केली आणि 'तीन पत्ती', 'कॅसिनो' यांसारख्या विविध ऑनलाइन गेम्समध्ये पैसे लावण्यास सुरुवात केली.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
वेबसाईट आणि बँक खात्यांचे मोठे जाळे
सुरुवातीला मोठा नफा दाखवून आरोपींनी आदेश यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा करून घेतली. KheloStar ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मचे संचालक आणि व्यवस्थापक, कस्टमर केअर प्रतिनिधी, https://khelostar247.com आणि https://khelosuper.com या संशयास्पद संकेतस्थळांचे धारक, फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी वापरण्यात आलेल्या विविध बँक खात्यांचे मूळ धारक या सर्वांनी मिळून हा कट रचल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
(नक्की वाचा- Navi Mumbai News: नवी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा! सिग्नलवरील यंत्रणेत होणार मोठे बदल)
कडक कलमांन्वये गुन्हा दाखल; तपास सुरू
याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विवेक भोईर यांनी हा गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या रॅकेटचा आणि बँक खात्यांचा तांत्रिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world