त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी
Latur News : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. ही केवळ मन हेलावून टाकणारी घटना नाही तर लातूर जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे. ही एकच नाही तर अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात महिन्याभरात उपचार विना किंवा चुकीचा उपचार झाल्यामुळे महिलांचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. महिनाभरापूर्वी एक महिला प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली असता बारा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. त्यानंतर तिला दुसरीकडे हलविण्यात आलं. यानंतर रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत हगवण-उलटीचा त्रास होत असल्याने दाखल झालेली महिलेवर डॉक्टरांनी इलाज न करता वार्ड बॉयने इंजेक्शन आणि इतर औषधी दिल्याने रिअॅक्शन होऊन त्या महिलेचा ग्रामीण रुग्णालयातच मृत्यू झाला. ही तिसरी घटना जिथं नगरसेविका शाहू ताई कांबळे यांनीही जीव गमावला.
शाहुताई कांबळे यांना संधिवाताचा त्रास होता. सोमवारी संध्याकाळी शाहूताई यांनी आपल्या पतीला संधीवातामुळे खांदे दुखत आहेत असे सांगितले. त्यानंतर त्यांनी गोळ्या घेऊन आराम केला. बरं वाटल्यानंतर पुन्हा रात्री साडेदहा वाजेपर्यंत त्या टीव्ही पाहत बसल्या आणि साडेदहाला टीव्ही बंद करून झोपायला गेल्या.
त्या एक तासात काय घडलं ?
पहाटे पाच वाजता शाहू ताई यांनी त्यांचे पती गोविंद कांबळे यांना झोपेतून उठवत मला कसतरी होतंय असं सांगितलं. तेव्हा गोविंद कांबळे यांनी ताबडतोब उठून आपली स्कुटी घेऊन बस स्टॅन्ड जवळून ऑटो रिक्षा बोलवून आणली. रिक्षात बसून ते दोघेजण पहिल्यांदा ओळखीचे असलेले आणि शासकीय ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर असलेले डॉक्टर धीरज देशमुख यांच्या खाजगी रुग्णालयात गेले. मात्र डॉक्टर धीरज देशमुख तिथे उपस्थित नाहीत अशी माहिती मिळाल्यानंतर त्याच रिक्षात बसून दोघेजण हृदय विकार तज्ज्ञ असलेले डॉक्टर पी एस कदम यांच्या कदम हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. तिथं ड्युटीवर असलेल्या नर्सने डॉक्टर नाहीत असे सांगितल्यानंतर पुन्हा रिक्षात बसून दुसऱ्या डॉक्टरांकडे निघालेय.
डॉक्टरांच्या शोधात तब्बल पाऊणतास उलटला...
दरम्यान शाहू ताई कांबळे यांच्या छातीत कळ येत होती. त्यांना वेदना असहय्य झाल्याचं त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं. वेदना अधिक झाल्याचे सांगितल्यानंतर पती गोविंद कांबळे घाबरले. हृदयविकार तज्ज्ञांकडे गेल्याशिवाय पर्याय नाही हे जाणून घेऊन गोविंद कांबळे यांनी रिक्षा दुसरे हृदयविकार तज्ज्ञ असलेले डॉक्टर ऋषिकेश पाटील यांच्या पाटील हॉस्पिटलकडे घेण्यास सांगितली. रिक्षा पाटील हॉस्पिटलच्या समोर थांबली. डॉक्टरांना बोलवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिथेही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. डॉक्टर आलेच नाहीत. तोपर्यंत जवळपास पाऊण तास उलटून गेला होता आणि शाहूताई कांबळे यांच्या वेदना अधिक वाढत होत्या. त्रास वाढत होता आणि डॉक्टरांचा प्रतिसाद मात्र कुठेच मिळत नव्हता. त्यामुळे शेवटी नाईलाजाने आणि किमान प्रथमोपचार तरी मिळेल, या विचाराने गोविंद कांबळे यांनी रिक्षा शासकीय ग्रामीण रुग्णालयात घेतली. तिथे उपस्थित असलेल्या नर्सने डॉक्टरांना ताबडतोब बोलावले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शाहू ताई कांबळे यांच्या हृदयाचे ठोके पडणे बंद झाले होते. डॉक्टर चिवडे यांनी तत्काळ पंपिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. शाहूताई यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले ते कायमचे. यानंतर डॉक्टर चिवडे यांनी हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद वट्टमवार यांना तत्काळ येण्यास सांगितले. अगदी लगेचच डॉक्टर वट्टमवार सुद्धा उपस्थित झाले. मात्र त्यांनी शाहू ताई कांबळे यांची नाडी तपासून ठोके बंद पडल्याचे आणि गोविंद कांबळे यांना धीर धरून परिस्थितीला सामोरे जाण्यास सांगितले.
अवघ्या एक तासात गोविंद कांबळे यांचा कुटुंब उध्वस्त
चार परिवारांचा आधार असलेल्या शाहू ताई कांबळे मध्यमवर्गीय कुटुंबातल्या. पण सामाजिक कार्याच्या माध्यमातून फक्त प्रभागातच नव्हे तर शहरातही त्यांनी सुसंस्कारित लढवय्या असे प्रतिमा निर्माण केली होती. महिलांच्या प्रश्नांवर कायम अग्रेसर असायच्या. त्यामुळे पक्षातील वरिष्ठांच्या मनात सुद्धा शाहू ताईंबद्दल आदरच होता. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या टीम पैकी एक असलेल्या कांबळे यांच्या जाण्याने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. तर शाहू ताई कांबळे यांची जागा आता कोणीही घेऊ शकत नाही. त्यांचं कामच तसं होतं या शब्दात सहकार मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सुद्धा फोन करून कांबळे कुटुंबीयांना धीर दिला तर सहकारमंत्र्यांना कांबळे कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.