Missing women in Maharashtra : राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या आकड्यांनी धडकी भरवली आहे. एका वर्षात तब्बल 48 हजार 278 महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, राज्याच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभेत विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही विदारक स्थिती स्पष्ट झाली आहे.
बेपत्ता महिलांच्या संख्येत मोठी वाढ
राज्यात 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. 2024 मध्ये ही संख्या 45 हजार 662 इतकी होती, जी 2025 मध्ये वाढून 48 हजार 278 वर पोहोचली आहे. चिंतेची बाब म्हणजे, बेपत्ता होणाऱ्या सर्वच महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप पूर्ण यश आलेले नाही.
2024 मध्ये बेपत्ता झालेल्यांपैकी 30 हजार 877 महिलांचा शोध लागला होता, तर 2025 मध्ये हा आकडा 36 हजार 581 इतका आहे. हजारो महिला अद्यापही बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा रिजेक्ट झालेला अर्ज पुन्हा होईल मंजूर; फक्त फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स )
पाच शहरांमध्ये अधिक प्रमाण
मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच मोठ्या शहरांमध्ये अल्पवयीन मुले आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. आमदार मंगेश कुडाळकर, प्रशांत ठाकूर आणि मनिषा चौधरी यांच्यासह अन्य आमदारांनी या गंभीर विषयावर सरकारला प्रश्न विचारले होते.
याबाबत माहितीनुसार, या पाच जिल्ह्यांत 2024 ते 2025 या कालावधीत एकूण 4 हजार 989 बालके हरवल्याची नोंद झाली. सुदैवाने, यापैकी 4 हजार 813 बालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेषतः 14 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या शोधाचे प्रमाण 96 टक्क्यांहून अधिक आहे, ही एक जमेची बाजू मानली जात आहे.
(नक्की वाचा : Bhigwan kidnapping case: प्रेमाचा दावा फोल? पाचच दिवसांत तरुणीनं बदलला निर्णय; भिगवण प्रकरणाला अनपेक्षित वळण )
ऑपरेशन मुस्कान काय आहे?
बेपत्ता आणि शोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारकडून ऑपरेशन मुस्कान राबवले जात आहे. 2015 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात एकूण 13 वेळा ही मोहीम राबवण्यात आली असून यंदाच्या वर्षीही हे ऑपरेशन प्रभावीपणे सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेमुळे अनेक कुटुंबांना त्यांची हरवलेली मुले परत मिळाली आहेत.
नवजात मुलांच्या विक्रीचे रॅकेट
केवळ महिला किंवा मोठी मुलेच नाही, तर नवजात मुलांच्या सुरक्षेचा मुद्दाही तितकाच गंभीर बनला आहे. राज्यात नवजात बालकांच्या विक्रीच्या घटना समोर आल्या असून, याप्रकरणी मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागात एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मानवी तस्करी आणि अशा गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महिला आणि बालकांच्या बेपत्ता होण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, याचा सखोल तपास आता अधिक वेगाने होणे गरजेचे झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world