जाहिरात

Shirdi News : सावधान! शिर्डीत भाविकांच्या वेशात फिरतायत पाकिटमार, कपडे बदलून डल्ला मारणारी टोळी कशी सापडली?

Shirdi News : ही टोळी अतिशय चलाखीने आपली वेशभूषा बदलून भाविकांमध्ये मिसळत होती आणि संधी मिळताच त्यांचे मौल्यवान सामान लंपास करत होती.

Shirdi News : सावधान! शिर्डीत भाविकांच्या वेशात फिरतायत पाकिटमार, कपडे बदलून डल्ला मारणारी टोळी कशी सापडली?
Shirdi News : शिर्डी पोलिसांनी या टोळीकडून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिर्डी:

सुनिल दवंगे प्रतिनिधी, 

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो भाविक दररोज हजेरी लावतात. श्रद्धेच्या या वातावरणात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे खिसे साफ करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात शिर्डी पोलिसांना आणि साईसंस्थानच्या सुरक्षा विभागाला मोठे यश आले आहे. 

ही टोळी अतिशय चलाखीने आपली वेशभूषा बदलून भाविकांमध्ये मिसळत होती आणि संधी मिळताच त्यांचे मौल्यवान सामान लंपास करत होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेतून वाचण्यासाठी हे चोरटे दर अर्ध्या तासाला आपले कपडे आणि लूक बदलत असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी या टोळीकडून 1 लाख 17 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईबाबा मंदिराच्या क्रमांक 3 प्रवेशद्वाराजवळ काही व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे साध्या वेशातील पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. यामध्ये एक पुरुष, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. 

सुरुवातीला हे सर्वजण सर्वसामान्य भाविकांसारखेच दिसत होते, मात्र त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. काही वेळानंतर या टोळीतील अल्पवयीन मुलगा एका महिला भाविकाची पर्स चोरण्याचा प्रयत्न करत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

(नक्की वाचा : Shirdi News: 'बीफ खाल्ल्यावर गोरं होतं आणि नमाज...' शिर्डीत 15 वर्षांच्या मुलीचा लग्नासाठी छळ, वाचा सविस्तर )

अशी होती चोरीची पद्धत

या टोळीची चोरी करण्याची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती. तपासातातून समोर आलेल्या माहितीनुसार, हे आरोपी आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील आत्माकुर गावचे रहिवासी आहेत. ते रेल्वेने नागपूरला आले आणि तिथून शुक्रवारी सकाळी शिर्डीत दाखल झाले होते. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देण्यासाठी हे लोक दर काही वेळाने त्यांची वेशभूषा बदलत असत. 

मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयाचा वापर करून ते कपडे बदलत आणि फ्रेश होऊन पुन्हा नवीन रूपात गर्दीत सामील होत. चांगले कपडे आणि तेलुगु भाषेतील संवादामुळे कोणालाही त्यांच्यावर संशय येत नसे. मात्र, त्यांच्या या क्लृप्त्या सुरक्षा रक्षकांच्या चपळाईपुढे टिकू शकल्या नाहीत.

( नक्की वाचा : Pune News : आईचा मित्र बनला नराधम,13 वर्षांच्या मुलीला शाळेत नेतो म्हणून भर रस्त्यात कारमध्येच...पुण्यात संताप )

मोठा मुद्देमाल जप्त आणि आरोपींची ओळख

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सैयद खाजा, गोकुळा कलम्मा आणि मणिकला रमुलाम्मा अशी निष्पन्न झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले असून, या टोळीतील आणखी एक सदस्य सध्या फरार आहे. पोलिसांनी या कारवाईत विविध कंपन्यांचे 10 मोबाईल फोन, काही परदेशी चलन आणि 1100 रुपये रोख असा एकूण 1 लाख 17 हजार 370 रुपयांचा माल जप्त केला आहे. 

या सर्वांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com