सुनील दवंगे, प्रतिनिधी
Shirdi News : शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात स्वतः VVIP असल्याचा आव आणत नियमबाह्य पद्धतीने राजमुद्रा लावलेल्या दोन आलिशान वाहनांमुळे रविवारी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. साईबाबा मंदिराच्या प्रोटोकॉल प्रवेशद्वार क्रमांक 2 समोरील मुख्य रस्त्यावर ही वाहने उभी केल्याने भाविकांच्या ये-जा आणि वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. स्थानिक व्यावसायिकांनी वाहने बाजूला घेण्याची विनंती केली असता त्यांना दमदाटी करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर संबंधितांनी वाहतूक पोलिसांनाही “हे वाहन आमदाराचा रथ आहे” असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील संबंधित व्यक्तीचे नाव रमेश यज्ञकर जालना जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. ते साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यांच्या ताब्यातील MH-21 CA-7900 आणि MH-21 CG-7900 या क्रमांकाची दोन आलिशान वाहने मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर उभी करण्यात आली होती. या दोन्ही वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने राजमुद्रा, फॅन्सी नंबर प्लेट आणि इतर व्हीव्हीआयपी स्वरूपाची चिन्हे लावण्यात आली होती.
घटनेची माहिती तसेच स्थानिकांच्या तक्रारीनंतर शिर्डी वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारवाईची चाहूल लागताच संबंधितांनी वाहने घेऊन निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी रस्त्यातच दोन्ही वाहने अडवून शिर्डी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर वाहनांवरील राजमुद्रा काढून घेण्यात आली, नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट हटविण्यात आल्या, तसेच काळ्या फिल्म लावलेल्या काचा काढून मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
प्रोटोकॉल गेट परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
साईबाबा मंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक 2 हे प्रोटोकॉल महाद्वार म्हणून ओळखले जाते. याच मार्गाने राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, न्यायमूर्ती तसेच इतर संवैधानिक पदाधिकारी मंदिरात प्रवेश करतात. त्यामुळे हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. अशा ठिकाणी नियमबाह्य राजमुद्रा लावलेली वाहने सहजपणे कशी पोहोचली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
राजमुद्रा लावण्याचे नियम काय?
राजमुद्रा किंवा अशोकचक्र असलेले अधिकृत राज्यचिन्ह हे सर्वसामान्य नागरिकांना किंवा खासगी वाहनांवर वापरण्यासाठी मान्य नाही. ‘State Emblem of India (Prohibition of Improper Use) Act, 2005' आणि संबंधित नियमांनुसार राज्यचिन्हाचा वापर केवळ अधिकृत शासकीय कामकाजासाठी आणि शासनाने अधिकृत केलेल्या व्यक्ती किंवा कार्यालयांनाच करता येतो. खासगी वाहनांवर राजमुद्रा लावून स्वतःला शासकीय अधिकारी किंवा व्हीव्हीआयपी असल्याचा आभास निर्माण करणे नियमबाह्य ठरू शकते.
नक्की वाचा - Nashik Rain : अवघ्या 4 दिवसात नाशिकचं चित्र पालटलं; मराठवाड्यालाही मोठा दिलासा मिळणार!
वाहनांवरील नियम काय सांगतात?
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांवर मानक स्वरूपाची HSRP नंबर प्लेट असणं बंधनकारक आहे. फॅन्सी फॉन्ट, डिझाइन केलेल्या नंबर प्लेट, नंबर अस्पष्ट करणारे स्टिकर्स किंवा अनधिकृत चिन्हांचा वापर नियमबाह्य आहे. तसेच, न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान नियमांनुसार नियमबाह्य काळ्या फिल्म लावलेल्या काचा वापरणेही दंडनीय आहे.
परिवहन विभागाच्या अंमलबजावणीवरही प्रश्न
राजमुद्रा लावण्यासाठी स्पष्ट नियमावली अस्तित्वात असताना खासगी वाहनांवर अशा प्रकारे राजमुद्रा लावून वाहने रस्त्यावर कशी फिरतात? अशा वाहनांवर वेळेवर कारवाई का होत नाही? परिवहन विभाग आणि संबंधित यंत्रणांना हे प्रकार दिसत नाहीत का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केले जात आहेत. धार्मिक स्थळांवर व्हीव्हीआयपी असल्याचा आव आणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world