बापाने दुसरं लग्न केलं, मुलाची सावत्र आई घरी आणली. यानंतर मुलावर बापाने सावत्र आईला 'अम्मी' म्हणण्याची सक्ती केली. जन्मदात्या आईवर प्रेम करणाऱ्या मुलाने बापाची ही मागणी धुडकावून लावली. याचा राग आल्याने बापाने कात्रीने भोसकून मुलाला ठार मारली. ही भयानक घटना मुंबईतील डोंगरी भागात घडली आहे. सलीम अली शेख उर्फ मद्रासी असं आरोपीचं नाव असून मयताचे नाव इम्रान शेख असं आहे. याहूनही धक्कादायक बाब ही आहे की जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते आणि गजबजलेल्या परिसरात हा खून करण्यात आला आणि या गुन्ह्याबद्दल पोलिसांना कळवण्याची कोणीही तसदी घेतली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2018 साली घडलेल्या या घटनेचा निकाल लागला असून आरोपी 'सलीम उर्फ मद्रासी' याला दोषी ठरवण्यात आले होते. सलीमला मुंबई सत्र न्यायालयाने मुलाचा खून केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सलीम हा 49 वर्षांचा आहे तर त्याचा मुलगा इम्रान हा 20 वर्षांचा होता. न्यायाधीश एस.डी.तवशीकर यांनी आपल्या आदेशात म्हटले की इम्रानचा मृत्यू झाल्यानंतर सदर प्रकार पोलिसांना कळवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. ही बाब जेव्हा इम्रानच्या आईला कळाली तेव्हा तिने पोलिसांत धाव घेतली होती. सदर घटनेमुळे घटत चाललेली संवेदनशीलता आणि अशा गंभीर प्रकारांबद्दल लोकांची बेफिकीर वृत्ती ही ठळकपणे दिसून आली आहे. इम्रानच्या मृत्यूचा खटला न्यायालयात उभा राहिला तेव्हा इम्रानची आई परवीन शेख हिने सांगितले की इम्रान हा अंमली पदार्थाच्या अमलाखाली होता तेव्हा त्याचे आणि सलीमचे भांडण झाले , भांडणादरम्यान सलीमने इम्रानला ठार मारले आणि नंतर स्वत:लाही जखमी करून घेतले. न्यायाधीशांनी म्हटले की मुलाच्या मृत्यूनंतर परवीन ही आपल्या नवऱ्यावर बालंट येऊ नये यासाठी प्रयत्न करत होती. मात्र परिस्थितीजन्य पुरावे हे वेगळी कहाणी सांगत होते.
नक्की वाचा : मिर्ची भजी खात केलेली दबंगगिरी पप्पू कलानींना भोवणार? नक्की प्रकार काय?
आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की त्याला या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रयत्न केला. यावर निकालात म्हटले आहे की, आरोपी हा मयताचा बाप होता, तरीही त्याने त्याच्याबद्दल कोणतीही सहानुभूती दाखवली नाही. इम्रानला भोसकल्यानंतर त्याला परवीनने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात इम्रानला मृत घोषित केले होते. यावरून सलीम हा घटनास्थळीही नव्हता आणि रुग्णालयातही नव्हता हे दिसून येते असे निकालात म्हटले आहे.