Nashik Crime : नाशिकमध्ये एका वृद्ध मात्र धाडसी नणंद-भावयांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मंगळसूत्र चोरीला जाण्यापासून वाचवण्यात आलं आहे. या दोघींनी मिळून त्या चोराला चांगलाच चोप दिला. यानंतर चोर बाईक आणि हातातील बॅग तेथेच टाकून देत फरार झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, या चोराने पत्ता विचारण्याचा बनाव करीत वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं. तो पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र वृद्ध नणंद आणि भावजयीने त्याला वेळीच पकडलं आणि चांगलाच चोप दिला. यानंतर दुचाकीवरुन पळ काढणारा चोर खाली पडला. चोर दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पळून जाण्यास यशस्वी झाला. मात्र उपनगर पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली आहे. पळून जाणाऱ्या चोरट्यावर 75 गुन्हे दाखल असून तो मूळचा राहणारा अमरावतीचा आहे.
नक्की वाचा - Nashik News: विवाहितेने 2 चिमुकल्यांसह विहीरीत घेतली उडी, भयंकर कारण आलं समोर
नाशिक रोड भागातील जय भवानी रोडवर चव्हाण मळा येथील वयोवृद्ध नणंद आणि भावजयी देवदर्शनासाठी सोमवारी सकाळी निघत असताना हा प्रकार घडला. पत्ता विचारण्याच्या बनाव करत चोराने फिर्यादी सौदीराम यांच्या गळ्यातील सोन्याचे अडीच तोडे वजनाचे सव्वा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढत दुचाकीच्या दिशेने पळू लागला. यावेळी नणंद-भावजयीने आरडाओरड करत त्याच्यावर झडप घातली आणि दुचाकीसह त्याला खाली पाडले. झटापटीत चोर दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पडून गेला. पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. चोरट्याची बॅग पोलिसांनी तपासली असून त्यात दोन सोन्याचे मंगळसूत्र सापडले आहेत. ही संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे उपनगर पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली असून त्याला शोधण्यासाठी विविध पथक रवाना करण्यात आले आहेत.