जाहिरात

Kolhapur News: फोटो दाखवला, लग्न ठरवलं अन् खिसा रिकामा केला, कोल्हापुरात नवरदेवाबाबत नक्की काय घडलं?

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातल्या लग्नाच्या नावाखाली एका तरुणाला आर्थिक जाळ्यात ओढून त्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kolhapur News: फोटो दाखवला, लग्न ठरवलं अन् खिसा रिकामा केला, कोल्हापुरात नवरदेवाबाबत नक्की काय घडलं?
Kolhapur News: या टोळीने अजून किती जणांना असेच लुटले आहे, याचा तपास आता सुरू आहे.
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात लग्नाच्या नावाखाली एका तरुणाला आर्थिक जाळ्यात ओढून त्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे स्वप्न दाखवून आणि भावनिक साद घालून दोन एजंटांनी या तरुणाकडून तब्बल 1 लाख 82 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पन्हाळा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या असून या टोळीने अजून किती जणांना असेच लुटले आहे, याचा तपास आता सुरू झाला आहे.

काय आहे प्रकरण?

पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील प्रवीण अतिग्रे या तरुणाला लग्न जमवून देतो असे आश्वासन देऊन दोन एजंटांनी आपल्या जाळ्यात ओढले. या प्रकरणातील संशयित आरोपी पृथ्वीराज शहाजी भोसले आणि विकास अर्जुन चौगुले यांनी मार्च 2025 पासून प्रवीणची फसवणूक करण्यास सुरुवात केली होती. आरोपींनी प्रवीणला एका मुलीचा फोटो दाखवून त्याचे लग्न ठरल्याचा खोटा बनाव केला आणि त्यानंतर सुरू झाला फसवणुकीचा टप्पा.

( नक्की वाचा : संभाजीनगरमध्ये 2 मुलांच्या आईची भररस्त्यात हत्या; चुलत दिरासोबतच्या लग्नानंतर 'त्या' एका निर्णयाने घात झाला ! )

अशी केली आर्थिक लूट

आरोपींनी प्रवीणला पैशांसाठी वेगवेगळी कारणे सांगून भावनिक ब्लॅकमेल केले. मुलीला वडील नाहीत, त्यामुळे तिच्या चुलत्याला आणि भावाला पैसे द्यावे लागतील, असे सांगून सुरुवातीला मोठी रक्कम उकळली. त्यानंतर मुलीच्या मामाला तातडीने पैशांची गरज असून ते नंतर परत मिळतील, असे सांगून पुन्हा पैसे घेतले. 

इतकेच नाही तर मुलीचे 4 तोळे पॉलिश केलेले दागिने सोडवण्यासाठी 15 हजार रुपये घेतले आणि स्वतः कापड दुकानात जाऊन लग्नाचा बस्ता बांधून त्याचे पैसेही प्रवीणकडून भरून घेतले. अशा प्रकारे प्रवीणची एकूण 1 लाख 82 हजार रुपयांची लूट करण्यात आली.

( नक्की वाचा : Solapur News : 14 वर्षांची नवरी, 19 वर्षांचा नवरा, 4 महिन्यातच सारा खेळ संपला! प्रकरण वाचून अंगावर येईल काटा )

असा उघड झाला बनाव

काही दिवस उलटल्यानंतर आरोपींनी अचानक मुलीने लग्नास नकार दिल्याचे प्रवीणला सांगितले. एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवीणला संशय आला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने वेळ न घालवता पन्हाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोन एजंटांनी परिसरातील इतरही अनेक तरुणांना अशाच प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून गंडा घातला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दिशेने सखोल तपास सुरू आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com