मनोज सातवी
लग्नाच्या बहाण्याने दोन तरुणांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. यातून जन्माला आलेल्या बाळाची आरोपीने विक्री केली. आरोपीला पीडितेचे आईवडील आणि एका माजी नगरसेविकेनेही साथ दिल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यामध्ये घडली आहे. इथल्या आचोळे पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार बलात्कार करण्यात आल्याने पीडिता दोनवेळा गर्भवती राहिली होती असे तपासातून उघड झाले आहे. पोलिसांनी सदर प्रकरणी एकूण 16 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आचोळे परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीचे, ओळखीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. 2021 साली हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. लग्नाचे आमीष दाखवत आरोपीने पीडितेवर अनेकदा बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहिली होती. ती गर्भवती असल्याचे कळाल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला होता. सदर प्रकरण पीडितेच्या आईवडिलांना कळताच त्यांनी मदतीसाठी माजी नगरसेविकेकडे मदत मागितली होती. यावेळी माजी नगरसेविकेकडून आरोपीच्या कुटुंबाकडून प्रकरण मिटवण्यासाठी 4 लाख रुपये घेतले होते. यानंतर तिने नालासोपारा पूर्व,गाला नगर येथील आर.के.हॉस्पिटलमध्ये मुलीची प्रसुती करवली. पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही हा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला नव्हता.
पीडितेची प्रसुती झाल्यानंतर तिचे बाळ तिच्या आई-वडिलांनी माजी नगरसेविकेच्या मदतीने विकले असा आरोप पीडितेने केला आहे. सदर प्रकरणाचा कोणाला पत्ता लागू नये यासाठी पीडितेच्या कुटुंबियांनी घर बदलले. बदललेल्या ठिकाणी अन्य एका तरुणाने पीडितेशी जवळीक साधत शारिरीक संबंध ठेवले. त्यानेही लग्नाचे आमीष दाखवत पीडितेवर बलात्कार केला. ती गर्भवती असताना आरोपीने पीडितेला अमरावतीला नेले. तिथे तिची प्रसुती झाली. बाळ जन्माला आल्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार देत पीडिता आणि बाळाला तिथेच सोडून दिले. यानंतर पीडितेने कसंतरी नालासोपाऱ्याला पोहचत आचोळे पोलीस ठाणे गाठले. पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रसंग ऐकल्यानंतर पोलीसही हादरले आहेत.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 376, 376 (2) (एन) 317, 363, 371 आणि बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्याचे कलम 4 अन्वये (POCSO ) एकूण 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पीडितेवर बलात्कार करणारे दोन तरुण पीडित मुलीचे आई-वडील, एक माजी नगरसेविका, आर.के हॉस्पिटलच्या मधील दोन डॉक्टर आणि नवजात मुलीची विक्री करणारी महिला अशा एकूण 16 जणांचा समावेश आहे.