- मीरा रोड परिसरात 31 वर्षीय जुबेर अन्सारीने दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला केला
- आरोपीच्या घरातून आयसिसशी संबंधित कट्टरपंथी साहित्य आणि नोट्स जप्त
- मीरा रोड प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आला आहे
- पासर दामा, प्रतिनिधी
Mira Road Shocker: मुंबईजवळील मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र एटीएस (ATS) कडे सोपवण्यात आला आहे. आरोपीच्या घरातून आयसिसशी (ISIS) संबंधित काही संशयास्पद आणि कट्टरपंथी साहित्य सापडले, त्यामुळे तपास यंत्रणा आता दहशतवाद्याच्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत.
दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला
31 वर्षीय आरोपीचे नाव जुबेर अन्सारी असे आहे. घटनेच्या काही तासांतच नया नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली. त्यानंतर त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता 4 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला सोमवारी (27 एप्रिल) पहाटे 4 वाजता मीरा रोड (पूर्व) येथील नया नगर भागात वॉकहार्ट हॉस्पिटलच्या मागे असलेल्या अस्मिता ग्रँड मॅन्शनजवळ झाला. तिथे राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रेमेश सेन हे दोन सुरक्षा रक्षक ड्युटीवर तैनात होते.
कलमा न वाचल्यामुळे चाकूने वार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला तिथे येऊन मशिदीचा रस्ता विचारला. थोड्या वेळाने परत आल्यावर त्याने एका सुरक्षा रक्षकाला त्याचा धर्म विचारला आणि अचानक चाकूने हल्ला केला. त्यानंतर तो सुरक्षा रक्षकांच्या केबिनमध्ये गेला, तिथे त्याने दुसऱ्या व्यक्तीला कलमा वाचण्यास सांगितले. जेव्हा रक्षक ते वाचू शकला नाही, तेव्हा त्याने त्याच्यावरही हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही रक्षकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
आरोपीच्या घरातून ISISशी संबंधित साहित्य जप्ततपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या घरात काही नोट्स आणि आयसिसशी संबंधित साहित्य सापडले. एका नोटमध्ये त्याने स्वतःला या दहशतवादी संघटनेसोबत जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. एटीएसच्या सूत्रांनुसार, आरोपी हा हल्ला आयसिसच्या विचारसरणीशी जोडून दाखवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने या दोन्ही रक्षकांना मुद्दाम लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
(नक्की वाचा: Dombivli News: मैत्रीचा हात नाही; सैतानाचं जाळं! डोंबिवलीत मदतीसाठी गेलेल्या तरुणीचा नराधमाने केला घात)
विज्ञान पदवीधर, अमेरिकेत वास्तव्याला होता
पोलीस सूत्रांच्या मते, अन्सारी हा विज्ञान शाखेचा पदवीधर आहे आणि तो अनेक वर्षे अमेरिकेत राहिला होता, जिथे त्याचे कुटुंबीय अजूनही वास्तव्यास आहे. नोकरी न मिळाल्यामुळे काही वर्षांपूर्वी तो भारतात परतला आणि मीरा रोड परिसरात एकटाच राहून ऑनलाइन केमिस्ट्रीचे क्लासेस घेत होता. दरम्यान तो ऑनलाइन कट्टरपंथी विचारसरणीकडे वळला असावा, असा पोलिसांना संशय आहे. आरोपी सोशल मीडिया, व्हिडीओ आणि मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातून अशा पद्धतीचा कन्टेंट गोळा करत होता, जी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे;असा संशय तपास यंत्रणांना आहे.
पोलीस तपासत आहेत डिजिटल पुरावे
आता तपास यंत्रणा त्याच्या मोबाइल, इंटरनेट हिस्ट्री आणि संपर्काची माहिती तपासत आहेत. जेणेकरून त्याने हे कृत्य एकट्याने केले की त्याला कोणी मार्गदर्शन केले आहे का? हे स्पष्ट होऊ शकेल. आरोपीच्या नोटमध्ये “ISIS”, “लोन वुल्फ”, “जिहाद” आणि “गाझा” यासारखे शब्द आढळले आहेत. एटीएस या नोटची आणि आरोपीच्या डिजिटल फुटप्रिंट्सची कसून चौकशी करत आहे. हा हल्ला पूर्व-नियोजित होता की अचानक झालेला वाद, हे तपासाअंती स्पष्ट होईल.
(नक्की वाचा: 1 लाख रुपयांचा लॅपटॉप फक्त 15 हजार रुपयांत! Amazon ला लुबाडणाऱ्या भामट्यांची पद्धत वाचून व्हाल थक्क!)
कसून तपास सुरू
एटीएस सध्या आरोपीकडे आढळलेल्या नोट्सचा तपास करत आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात आरोपीच्या संभाव्य हेतूविषयी शंका निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण एटीएसकडे सोपवण्यात आले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "तपासादरम्यान जप्त केलेले काही साहित्य आणि आरोपीच्या पूर्वीच्या कारवायांमुळे सखोल तपास करणे गरजेचे होते. एटीएस आता सर्व पैलूंचा तपास करत आहे." तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "या टप्प्यावर कोणतीही शक्यता नाकारता येत नाही; आम्ही हल्ल्यामागील सर्व संभाव्य हेतूंचा तपास करत आहोत."