जाहिरात

Sangli News : मिरज रुग्णालयात 'वॉर'! कलगुटगी खून प्रकरणातील आरोपींना संपवण्याचा कट उघड, CCTV मध्ये थरार कैद

Miraj Hospital Attack : जुन्या वादातून कलगुटगीचा खून झाला होता, ज्यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Sangli News : मिरज रुग्णालयात 'वॉर'! कलगुटगी खून प्रकरणातील आरोपींना संपवण्याचा कट उघड, CCTV मध्ये थरार कैद
Miraj Hospital Attack : या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी

Miraj Hospital Attack : मिरज शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या एका खुनाच्या प्रकरणातील आरोपींवर खुनी हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका हल्लेखोराला पोलिसांनी वेळीच रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतले. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काय आहे प्रकरण?

मिरज येथे निखिल कलगुटगी याच्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना आज (बुधवार, 12 नोव्हेंबर) वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. जुन्या वादातून कलगुटगीचा खून झाला होता, ज्यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल कलगुटगी खुनातील आरोपी सलीम पठाण, चेतन सुरेश कलगुटगी, विशाल बाजीराव शिरोळे, आणि सुहेल जमीर लांचोळी यांना मिरज शहर पोलीस शासकीय रुग्णालयात घेऊन गेले होते. यावेळी सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांच्या समर्थकांनी रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत काही हल्लेखोर, आरोपींवर खुनी हल्ला करण्याच्या इराद्याने आले होते.

( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीत भूकंप! मनसे नेते राजू पाटील यांच्या भावाची ED कडून चौकशी; नेमके काय घडले? )
 

हल्लेखोरांपैकी एकाला पोलीस कर्मचाऱ्याने अत्यंत सतर्कतेने हेरले आणि हल्ला करण्यापूर्वीच त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. पोलिसांनी हल्लेखोराला बेड्या ठोकल्या असल्या तरी, त्याच्यासोबत आलेले आणखी 3 संशयित साथीदार मात्र घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा आणि मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाला. रुग्णालयात झालेल्या या थराराची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. पळून गेलेल्या तीन संशयित हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com