पुण्यात प्रशिक्षणादरम्यान IAS पूजा खेडकर यांचे धक्कादायक प्रकार, महत्त्वाचा अहवाल समोर

ऑडी कारवर लावलेल्या लाल दिव्यामुळे चर्चेत आलेल्या प्ररिविक्षाधीन पूजा खेडकर (Probationary Pooja Khedkar) यांच्याबाबत नवनवे खुलासे समोर येत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

ऑडी कारवर लावलेल्या लाल दिव्यामुळे चर्चेत आलेल्या प्ररिविक्षाधीन पूजा खेडकर (Probationary Pooja Khedkar) यांच्याबाबत नवनवे खुलासे समोर येत आहे. पूजा खेडकर यांच्या वडिलांची 40 कोटींची संपत्ती असताना त्यांना नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र कसं मिळालं, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नेमणुकीस असताना अनेक विभागांतील प्रशिक्षणाला दांडी मारल्याचे उघडकीस आले आहे. 

प्रशिक्षण घेतलेल्या विभागांमध्येही त्यांनी गैरवर्तन केल्याचे अहवाल संबंधित विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे दिले आहेत. खेडकर या ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये नऊ महिने चार दिवस प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. नऊ दिवसांच्या संक्रमण कालावधीनंतर 15 एप्रिल ते 31 मेपर्यंत (सात आठवडे) पुण्यातील यशदा येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. 3 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण कालावधी सुरू होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे वाहन, शासकीय निवासस्थान, कार्यालयात स्वतंत्र दालन आणि शिपाई आदी व्यवस्था करून ठेवण्याबाबत अगोदरच भेट देऊन, व्हॉट्सअॅपद्वारे संदेश पाठवून अधिकाऱ्यांकडे तगादा लावला होता. जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी असल्याने खेडकर यांना काही सुविधा पुरविल्या.

Advertisement

नक्की वाचा - IAS पूजा खेडकर प्रकरणाचा पहिला अहवाल सादर; नवी मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखा, जिल्हा नियोजन शाखा, पुरवठा शाखा, सर्वसाधारण शाखा, लेखा शाखा, कुळकायदा शाखा, पुनर्वसन शाखा, खनिकर्म शाखा, भूसंपादन समन्वय शाखा, संजय गांधी निराधार योजना शाखा, गृह शाखा आदी कार्यालयांमध्ये 14 जूनपर्यंत प्रशिक्षण घेण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. काही शाखांमध्ये दोन दिवस, काही ठिकाणी एक दिवस, तर काही शाखांमध्ये अर्धा दिवस असे प्रशिक्षणाचे नियोजन होते. पण यांपैकी काही विभागांमध्ये खेडकर यांनी प्रशिक्षण घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 ते 21 जून (एक आठवडा) विभागीय आयुक्तालय, 24 ते 26 जून ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, 27 आणि 28 जून असे दोन दिवस जिल्हा न्यायालय, त्यानंतर 1 ते 5 जुलै जिल्हा कोषागार कार्यालय आणि पुढील इतर सर्व शासकीय शाखा, आस्थापना, कार्यालयांमध्ये प्रशिक्षणासाठी 30 जुलै 2025 पर्यंत प्रशिक्षणाचे नियोजन होते. पण जिल्हा कोषागार कार्यालयातील प्रशिक्षणानंतर गैरवर्तणुकीमुळे पुढील प्रशिक्षणासाठी त्यांना राज्य शासनाकडून वाशिम जिल्ह्यात पाठविण्यात आले.

Advertisement

विभागांच्या प्रमुखांनी दिलेल्या अहवालात त्यांची वर्तणूक चांगली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, माहिती खोडून काढणे, प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणे, तसेच दिलेल्या सेवांचा गैरवापर करणे अशी वर्तणूक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. संबंधित अहवाल जिल्हाधिकारी डॉ. दिवस यांच्याकडे देण्यात आले आहेत.

Advertisement