Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातून पोलीस दलाला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मदतीसाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या एका 23 वर्षीय तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. एका पोलीस उपनिरीक्षकानेच पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल चोरीची तक्रार आणि ओळखीची सुरुवात
या प्रकरणातील पीडित तरुणी मूळची नांदेड जिल्ह्यातील असून ती सध्या पुण्यात खासगी नोकरी करते. मार्च 2025 मध्ये तिचा मोबाइल हरवला होता आणि त्याची तक्रार देण्यासाठी ती छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेली होती. तिथे तिची भेट पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण यांच्याशी झाली. चव्हाण यांनी तक्रार नोंदवून घेताना तिचा मोबाइल क्रमांक घेतला आणि त्याच रात्रीपासून तिच्याशी संपर्क वाढवला. हळूहळू तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवण्यात आले.
लग्नाचे खोटे आमिष आणि लैंगिक छळ
काही दिवसांनी तुझा मोबाइल सापडला आहे असे सांगून सुभाष चव्हाण यांनी तरुणीला संभाजीनगरला बोलावून घेतले. एका हॉटेलमध्ये चहा पिताना त्यांनी तिच्या जातीबद्दल विचारणा केली आणि त्यानंतर लग्नाचे आश्वासन दिले.
मी तुझ्याशी लग्न करेन आणि तुला कधीच सोडणार नाही असा विश्वास देऊन त्यांनी शहरातील विविध लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इतकेच नाही तर अहिल्यानगर येथे नेऊन तिच्या गळ्यात बनावट मंगळसूत्र बांधले आणि तू माझी पत्नी आहेस अशी खोटी खात्री तिला पटवून दिली.
( नक्की वाचा : Bhigwan Kidnapping Case: तरुणीला आईकडे जायचं नाही, मग कुठे राहणार? पोलीस स्टेशनमध्ये काय झालं? वाचा सर्व अपडेट )
तीन वेळा गर्भपात आणि मारहाण
आरोपी सुभाष चव्हाणने पीडितेवर केवळ अत्याचारच केले नाहीत, तर तिला तीन वेळा गर्भपातास भाग पाडले. पहिला गर्भपात पुण्यात करण्यात आला, तर नोव्हेंबर 2025 मध्ये खोटे बोलून संभाजीनगरमध्ये दुसरा गर्भपात करण्यात आला. जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही देण्यात आली.
पत्नी आणि मुलाचाही गुन्ह्यात समावेश
जानेवारी 2026 मध्ये पीडित तरुणी पुन्हा चव्हाण यांना भेटण्यासाठी आली असता तिला क्रूर वागणूक देण्यात आली. मी उच्च जातीचा असून तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करणार नाही असे म्हणत तिला मारहाण झाली. या वादात सुभाष चव्हाण यांची पत्नी आणि मुलगा यांनीही हस्तक्षेप केला. आरोपीच्या पत्नीने पीडितेच्या पोटावर मारहाण केली, ज्यामध्ये तिचा तिसऱ्यांदा गर्भपात झाला. या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली.
( नक्की वाचा : Biryani Scam : बिर्याणीच्या एका प्लेटने उघड केला 70,000 कोटींचा महाघोटाळा, गुन्हेगारांनी वापरली भलतीच शक्कल )
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.