ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai News : मुंबईच्या अग्रिपाडा परिसरातील ड्रग्ज नेटवर्कविरोधात मोठ्या कारवाईत मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात कार्यरत असलेल्या एका अवैध ड्रग्ज उत्पादन युनिटचा पर्दाफाश केला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या छाप्यात अंदाजे ५० ते ६० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई पोलीस ANC चे डीसीपी नवनाथ ढवळे यांनी सांगितलं की, सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून ३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघे भाऊ असून पश्चिम बंगालचा पत्ता असलेल्या एका महिलेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. प्राथमिक तपासात ती बांगलादेशी असल्याचे सूचित होते.
५१ कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त...
प्राथमिक माहितीनुसार, एएनसीला संशयास्पद अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल विशिष्ट माहिती मिळाली. यानंतर, एका विशेष पथकाने कारवाई करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला. तपासात असं उघड झालं की, मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचे उत्पादन केले जात होते. शोध मोहिमेदरम्यान, अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, अमली पदार्थ निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल आणि उपकरणे जप्त केली. जप्त केलेल्या अमली पदार्थांचा प्रकार आणि प्रमाण सध्या तपासाखाली आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी अंदाजे ५१ कोटी रुपये किमतीचे १४ किलो एमडी आणि द्रव एमडी जप्त केले. आरोपीकडून एक पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे, या छाप्यादरम्यान एएनसीच्या पथकाने घटनास्थळावरून शस्त्रे आणि जिवंत काडतुसेही जप्त केली. यामुळे या अमली पदार्थ सिंडिकेटचे संबंध संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी असू शकतात, असा संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणात मोहम्मद शौफ शौकत अली मन्सूरी (वय ३३), सुफियान सलीम मन्सूरी (वय २९), मामुनी सुनील सरकार (वय २३) यांना अटक केली आहे.