ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai Doctor Suicide : मुंबईतील एंटॉप हिल परिसरातून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली असून एका 24 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्तुती सोनावणे असं या विद्यार्थीनंच नाव आहे. प्रियकराने चारित्र्यावर केलेले गलिच्छ आरोप आणि सततच्या संशयाला कंटाळून या एमडीएस करणाऱ्या स्तुतीनं हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी तपास वेगाने सुरू केला आहे.
काय आहे प्रकरण?
स्तुती नवी मुंबईतील एका डेंटल कॉलेजमध्ये एमडीएसचे शिक्षण घेत होती. ती आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत एंटॉप हिल परिसरात राहत होती. तिचे मोहम्मद फौझील नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांना घटनास्थळावरून 6 पानांची सुसाईड नोट सापडली असून, त्यात तिने आपल्या आयुष्यातील धक्कादायक अनुभव मांडले आहेत.
सुरुवातीला या दोघांचे संबंध चांगले होते, मात्र कालांतराने फौझील तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तो तिच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ आरोप करत असे, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती.
( नक्की वाचा : Minister Scandal : 'हो, माझे 5000 अफेअर्स आहेत!"; पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर बड्या मंत्र्याची निर्लज्ज कबुली )
श्रद्धा वालकर केस आणि फ्रिजचा उल्लेख
या सुसाईड नोटमधील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे त्यातील श्रद्धा वालकर हत्याकांडाचा संदर्भ. या तरुणीचे मित्रमैत्रिणी तिला मस्करीत म्हणायचे की, "एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील". सुसाईड नोटमध्ये या वाक्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. प्रियकरासोबतच्या नात्यात तिला किती असुरक्षित वाटत होते, हे या एका वाक्यावरून स्पष्ट होत आहे. स्वतःच्या जवळच्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या अशा प्रतिक्रियांमुळे तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.
मंगळवारी सकाळी ही धक्कादायक घटना समोर आली. नेहमीप्रमाणे स्तुती तिच्या खोलीत होती, मात्र सकाळी 11 वाजेपर्यंत ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी वारंवार दरवाजा वाजवूनही प्रतिसाद मिळाला नाही, अखेर दरवाजा तोडून पाहिले असता तिने नायलॉनच्या ओढणीने गळफास घेतल्याचे समजले. तिला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
( नक्की वाचा : Pandharpur News: सगळीकडे इंधन टंचाई, पण पंढरीत भाविकांना मिळणार तृप्तीचा घास; विठ्ठलाच्या चरणी भक्तांसाठी खास सोय )
6 पानांची सुसाईड नोट आणि पुढील तपास
एंटॉप हिल पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनास्थळावरून जप्त केलेली 6 पानांची सुसाईड नोट हा या प्रकरणातील मुख्य पुरावा मानला जात आहे. या चिठ्ठीत तिने फौझीलकडून होणाऱ्या छळाचा सविस्तर पाढा वाचला आहे. पोलीस आता या सुसाईड नोटच्या आधारे मोहम्मद फौझीलची चौकशी करत असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world