- ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai Local Murder CCTV: मुंबई लोकलच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता समोर आले आहे. मयंक लोहारची हत्या केल्यानंतर काळ्या रंगाचे कपडे घातलेला आरोपी रेल्वे स्टेशनबाहेर पडतानाचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. या रक्तरंजित घटनेमुळे मुंबईत प्रचंड खळबळ उडाली असून बोरीवली जीआरपी (GRP) पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत.
कांदिवली-बोरीवली रेल्वे स्टेशनदरम्यान थरार
रेल्वे (बोरीवली) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (23 जून) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना कांदिवली आणि बोरीवली रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाला. वेस्टर्न रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वादानंतर लोकलमधील काही प्रवाशांनी आरोपीला मारहाण केली होती.
Mumbai Local Train Murder| सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईत हे काय घडलं? लोकलमध्ये प्रवाशाची हत्या, पाहा CCTV
मारहाणीमुळे संतापला मग बॅगेतून काढला चाकू अन्...
प्रवाशांनी केलेल्या मारहाणीमुळे आरोपी प्रचंड संतापला. त्याने रागाच्या भरात आपल्या जवळील बॅगेतून चाकू काढला आणि थेट मयंक लोहारवर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, मयंक लोहारचा जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. मयंकवर वार केल्यानंतर आरोपी चालत्या लोकलमधून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
(नक्की वाचा : Mumbai Local Murder: मुंबई लोकल रक्ताने माखली! दरवाजा बंद करण्यावरून रक्तरंजित राडा, प्रवाशावर चाकूने सपासप वार)
मृतदेह पोस्टमार्टेमसाठी; पोलिसांची 6 पथके तैनातलोकलच्या डब्यात मयंक लोहारला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून इतर प्रवाशांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमार्टेमसाठी (Post-mortem) पाठवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली रेल्वे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची सहा विशेष पथके तयार करण्यात आली असून वेगवेगळ्या भागात त्याचा शोध घेतला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world