- ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai Local Murder: मुसळधार पावसात मुंबई लोकलच्या दरवाजावरून झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. मयंक लोहार असे मृत प्रवाशाचे नाव आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुसळधार पावसात दरवाजा बंद करण्यावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (23 जून ) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे लोकलमध्ये पावसाचे पाणी येऊ नये म्हणून प्रवाशांमध्ये दरवाजा बंद करायला सांगितला. पण यावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या हाणामारीत झाले. धावत्या ट्रेनमध्येच प्रवाशांमधील वाद विकोपाला गेला.
(नक्की वाचा : Pune Lohagad Case: 'ती' एक गोष्ट ओळखली असती तर केतनचा जीव वाचला असता; काय म्हणाले वडील विशाल अग्रवाल?)
आरोपीने केला चाकू हल्ला
वादादरम्यान अन्य काही प्रवाशांनी आरोपीला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या मारहाणीमुळे संतापलेल्या आरोपीने आपल्या बॅगेतून थेट चाकू काढला आणि मयंक लोहार याच्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की मयंक लोहार गंभीर जखमी झाला आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. धावत्या लोकलमध्ये अचानक झालेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे डब्यातील अन्य प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली.
आरोपीच्या शोधासाठी 6 पथके तैनातघटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे. पश्चिम रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांची सहा विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पश्चिम रेल्वे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world