जाहिरात

Merchant Navy Job Scam: 'मर्चंट नेव्ही'चे मायाजाळ! नोकरीच्या नावाखाली कसं फसवतात? सर्वकाही जाणून घ्या

प्रत्यक्षात या एजन्सीजकडे DG Shipping कडून मिळणारा आवश्यक RPSL (Recruitment and Placement Services Licence) परवाना नसतो.

Merchant Navy Job Scam: 'मर्चंट नेव्ही'चे मायाजाळ! नोकरीच्या नावाखाली कसं फसवतात? सर्वकाही जाणून घ्या

नवी मुंबई: नवी मुंबईच्या बेलापूर, वाशी, नेरुळ, खारघर आणि हावरे मॉल परिसरात सध्या मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी देतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या फेक शिपिंग कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तरुणांच्या ‘समृद्ध भविष्या'च्या स्वप्नांची निर्घृण पायमल्ली करत, या कंपन्या करोडोंची लूट करत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नवी मुंबईतील बेलापूर, CBD परिसरात स्वतःला "मर्चंट नेव्ही प्लेसमेंट एजन्सी" म्हणून सादर करणाऱ्या अनेक बनावट शिपिंग कंपन्या तरुणांना लाखो रुपयांना गंडवत आहेत. या कंपन्या मोठमोठ्या जहाजांवर नोकरी मिळवून देतो, असे सांगून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात. अनेक वेळा त्यांचा पासपोर्ट, ओरिजिनल कागदपत्रे घेऊन फसवणूक केली जाते, आणि नंतर कंपनीचे ऑफिस बंद  होते.

"मर्चंट नेव्हीमध्ये 3000-5000 डॉलर पगाराची जॉब, US vessel, oil tanker वर काम, आणि हमखास जॉइनिंग" – अशा जाहिराती, यूट्यूब व्हिडीओ, फेसबुक पेज, आणि वॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे इच्छुक तरुणांना आकर्षित केलं जातं. कंपनी ऑफिससुद्धा पाहिल्यावर काही वेळ त्यांचा विश्वास बसतो. सुसज्ज केबिन्स, इंग्रजी बोलणारे 'HR अधिकारी', फॉर्मल ड्रेस कोड. मात्र प्रत्यक्षात या एजन्सीजकडे DG Shipping कडून मिळणारा आवश्यक RPSL (Recruitment and Placement Services Licence) परवाना नसतो.

नक्की वाचा - Godavari River : तेलंगणाच्या सीमेवरील धरणात सहा मुलं बुडाली, नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबीयांचा आक्रोश


RPSL म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय?
RPSL ही भारत सरकारच्या DG Shipping (Directorate General of Shipping) कडून दिली जाणारी अधिकृत मान्यता आहे, जी कोणत्याही शिपिंग एजन्सीला क्रू मेंबरची भरती करण्यासाठी आवश्यक असते. या लायसन्सशिवाय कोणत्याही संस्थेला मरीन भरती करता येत नाही.

 RPSL नंबर नसलेली एजन्सी बेकायदेशीर आहे.

अशा कंपन्यांनी घेतलेली फी आणि दस्तऐवज सुद्धा कायदेशीर दृष्टीने अवैध ठरतात.

 अधिकृत कंपन्यांची यादी www.dgshipping.gov.in वर उपलब्ध आहे.

फसवणुकीची टेम्प्लेट
"ऑफिशियल" ऑफिस: बहुतेक वेळा बेलापूर किंवा वाशीतील मोठ्या इमारतींमध्ये रजिस्ट्रेशन नंबरसह ऑफिस असतं.

फेक डॉक्युमेंट्स: बनावट ऑफर लेटर, बोर्डिंग पास, व्हिसा तयार करून दिले जातात.

पासपोर्ट जमा: नोकरीच्या बहाण्याने मूळ पासपोर्ट आणि कागदपत्रं जमा करून घेतली जातात.

लाखो रुपयांची फी: 50 हजार ते 3 लाखांपर्यंत रक्कम वेगवेगळ्या कारणांनी घेतली जाते – मेडिकल, व्हिसा, ट्रेनिंग, प्रोसेसिंग वगैरे.

गायब होणे: पैसे मिळाल्यानंतर ऑफिस बंद, फोन बंद, सर्व संपर्क तोडला जातो.

Rohad village : कुटुंबातील 'होम मिनिस्टर'ने ठरवलं अन् गावात दारूबंदी लागू; धुळ्यातील या गावाची राज्यभरात चर्चा

2024 च्या शेवटी ठाण्यातील एका तरुणाने 2.5 लाख रुपये भरून नोकरी मिळणार म्हणून अर्ज केला होता. दुबईला पाठवून त्याचा पासपोर्ट काढून घेतला गेला. जेव्हा त्याला समजले की दिलेला पत्ता फेक आहे आणि कोणतीही कंपनी अस्तित्वातच नाही, तेव्हा त्याने निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिस यंत्रणा – दुर्लक्ष, निष्काळजीपणा की काही ‘तडजोड'?
बऱ्याच वेळा फसवणूक झाल्यानंतर तरुण पोलिसांकडे तक्रार करतात. मात्र स्थानिक पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांचं एकसंध उत्तर असतं – “ही सिव्हिल केस आहे. आम्ही यामध्ये काही करू शकत नाही.” काही वेळा तर पोलिसांकडून विचारलं जातं – "पैसे आम्हाला विचारून दिले होते का?" ही परिस्थिती अधिक धक्कादायक आहे कारण फसवणुकीसारख्या प्रकारांना IPC अंतर्गत कलम 420 नुसार गुन्हा ठरवता येतो. तरीही कारवाई करण्यास पोलिस टाळाटाळ करतात. यामागे राजकीय/प्रशासकीय हस्तक्षेप, अथवा 'हप्ता' संस्कृतीचा संशयही उपस्थित होतो.

फसवणूक झाल्यावर काय करावे?
DG Shipping ला ऑनलाईन तक्रार – www.dgshipping.gov.in

सायबर क्राईम/क्राईम ब्रांच – आर्थिक फसवणूक म्हणून नोंदणी होऊ शकते.

MCA (Ministry of Corporate Affairs) – जर ती कंपनी MCA मध्ये रजिस्टर्ड असेल.

लोकल पोलीस स्टेशन – IPC 420 अंतर्गत तक्रार द्यावी.

कमीशनर ऑफ पोलीस कार्यालय – थेट अंमलबजावणीसाठी लेखी निवेदन.

नवीन फसवणूक प्रकरणे (2024-2025):
“हार्दिक शिपिंग मॅनेजमेंट”, CBD बेलापूर: 20 हून अधिक विद्यार्थ्यांकडून १ कोटीहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप.

“इटालियन व्हिसा घोटाळा”: पासपोर्ट न देता गायब होणारी एजन्सी.

“ग्लोबल मरीन प्लेसमेंट”, वाशी: किमान 12 विद्यार्थी फसले.

तरुणांसाठी मार्गदर्शन:

1. कोणत्याही शिपिंग नोकरीसाठी पैसे देण्याआधी RPSL तपासा.

2. ऑफर लेटरची पडताळणी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा DG Shipping कार्यालयात करावी.

3. सोशल मीडियावरील जाहिरातींच्या जाळ्यात न अडकता नेहमी प्रत्यक्ष भेटी आणि कागदपत्र पडताळणी करा.

4. कोणतीही रक्कम दिल्यास लेखी पावती घ्या.

5. नवी मुंबईचा शिपिंग क्षेत्रातील विकास झपाट्याने होत असला तरी, या झपाट्याला बनावट कंपन्यांनी गंडा घातला आहे. तरुणांना जागरूकता आणि प्रशासनाला कठोर कारवाईची गरज आहे.

6. शिपिंग ही भविष्यातील संधी असली तरी, फसवणुकीपासून बचाव ही सर्वात मोठी खबरदारी आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com