ऋतिक गणकवार, मुंबई:
Mumbai ATC Raid: मुंबईत अवैध बांगलादेशी घुसखोरीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत 20 हून अधिक अवैध बांगलादेशी नागरिक ताब्यात घेतले आहेत. हे सर्वजण भारतात वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमधून शहराच्या सुरक्षेशी तडजोड नाही, मोहीम सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
मुंबईत बांग्लादेशींविरोधात मोठी कारवाई
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबईच्या सुरक्षेला असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी अवैध स्थलांतरितांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली आहे. अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा परिसरात दहशतवादविरोधी पथकाने (ATC) टाकलेल्या छाप्यात २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व नागरिक वैध कागदपत्रांशिवाय भारतात वास्तव्य करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या कारवाईने पुन्हा एकदा घुसखोरीच्या नेटवर्कचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही संशयास्पद व्यक्ती वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती एटीसी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी रात्री विशेष शोधमोहीम राबवली. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पुरुष आणि महिलांचा समावेश असून, त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचा किंवा वास्तव्याचा कोणताही अधिकृत पुरावा आढळलेला नाही. पोलिसांनी त्यांच्या विरोधात पारपत्र कायदा आणि परकीय नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घुसखोरांचा आकडा 30 च्या पार...
विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांत मुंबईत पकडलेल्या अवैध घुसखोरांचा आकडा आता ३० च्या पार गेला आहे. ८ फेब्रुवारी रोजी मालाडच्या पठाणवाडी परिसरातूनही चार जणांना अटक करण्यात आली होती. हे घुसखोर भारतात नेमके कोणत्या मार्गाने आणि कोणाच्या मदतीने आले, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
मानवी तस्करी किंवा बनावट कागदपत्रे बनवून देणारी एखादी टोळी यामागे सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची ओळख पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिपोर्ट (देशातून बाहेर काढणे) करण्याची प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पूर्ण केली जाणार आहे. "मुंबईच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही," असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world