एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका तरुणीचा मृत झाल्याची माहिती तिच्या कुटुंबाला मिळाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्या तरुणीचा शोध घेण्यासाठी विक्रोळी गाठले. तेथे पोलिसांची मदत घेण्यात आली. मृत तरुणीचा शोध सुरू असतानाच, ती जिवंत असल्याची माहिती समोर आली. कन्नमवार नगर, विक्रोळी येथील रहिवासी असलेली मनीषा सराटे नावाची ही महिला गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होती, असे सांगण्यात येत आहे.
बेपत्ता असलेल्या मनीषा सराटे हिचा एक फोटो 24 सप्टेंबर रोजी तिची बहीण उषा खंडारे यांना व्हॉट्सॲपवर दिसला. या फोटोत मनीषा मृत अवस्थेत दिसत होती. हा फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण कुटुंबात खळबळ माजली. कारण मनीषाचा शोध तिचे कुटुंबीय गेली 3 महिने घेत होते. फोटो मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंब विक्रोळी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी तक्रार नोंदवली.
तक्रार मिळाल्यानंतर विक्रोळी पोलीस स्टेशनच्या पथकाने संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. पण तपासादरम्यानच मनीषा जिवंत असल्याची माहिती मिळाली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मनीषा कळवा परिसरात एका तरुणासोबत राहत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी बरीच मेहनत घेतल्यानंतर त्या दोघांना कळवा परिसरातून ताब्यात घेतले. मनीषाने स्वतःच्या मृत्युची बातमी का पसरवली, याबाबत तिची चौकशी सुरू आहे.
चौकशीनंतर मनीषाला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल. पण बेपत्ता झाल्यानंतर मनीषाने आपला मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. शिवाय तो फोटो तिच्या बहिणीलाच कसा मिळाला याचाही शोध आता पोलीस घेत आहे. यात अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचंही पोलीस सुत्रांकडून समजत आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपासही करणार आहेत. दरम्यान, मनीषासोबत असलेल्या त्या तरुणाबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.