मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हायड्रोपोनिक पद्धतीने उगवलेला 4 कोटींचा गांजा पकडला आहे. या गांजासह 3 जणांना अटक करण्यात आली आहे. शुभा सिरोया (25), हर्ष चोक्सी (20) आणि सिद्धार्थ शेट्टी (25) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने ही कारवाई केली आहे. युनिट 9 चे प्रमुख असलेल्या दया नायक यांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी अंधेरी भागामध्ये छापेमारी करत 4 किल अमेरीकन हायड्रोपोनिक वीड जप्त केले. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किमंत 4 कोटी 5 लाख रुपयांच्या आसपास आहे. आरोपींकडून पोलिसांनी 5 मोबाईल फोन आणि 38 हजार रूपये रोख जप्त केले आहेत.
पोलिस स्टेशनमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधक युनिट
पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र अंमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अंमली पदार्थ आढळल्यास टेस्टिंगपासून पुढील कायदेशीर कारवाईपर्यंतची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. पोलिसांकडून शाळा-कॉलेज परिसरात विशेष लक्ष देण्यात येत असून, मुंबईत 2000 हून अधिक पानटपऱ्यांवर कारवाई करत त्यांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.
OTT वरील अंमली पदार्थांचे उदातीकरण थांबवणे गरजेचे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना म्हटले की, अंमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स भूमिका घेण्यात आली आहे. अंमली पदार्थांविरोधातील लढाई आता अधिक आक्रमक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अंमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. अशा कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबनाऐवजी थेट बडतर्फ करण्यात येत आहे असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी पुढे म्हटले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अंमली पदार्थांचे उदात्तीकरण थांबवायला हवे. यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यामार्फत ओटीटी प्लॅटफॉर्मशी किंवा अशा प्रकारच्या वेब सिरीज दाखविण्याऱ्या चॅनेल्सशी संपर्क साधून जाणीव जागृतीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.