ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai News : मुंबईतील कलिना पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांनी लिहिलेला सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर आलं आहे. त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबाकडून होत असलेल्या दबावातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सुसाइड नोटमधून समोर आलं आहे.
तू जीव दे नाहीतर तुझी नोकरी घालवणार
आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायचं नाव भैय्यासाब भीमराव व्हावळे असून ते ३२ वर्षांचे होते. नुकतेच ते मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. पोलीस शिपाई भैय्यासाहेब व्हावळे यांची ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. ते मूळचे परभणीचे निवासी होते.
प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून या पोलीस शिपाई यांनी आत्महत्या केल्याचं सुसाड नोटमध्ये लिहिलं आहे. 15 मार्च रोजी त्यांनी कलिना प्रशिक्षण केंद्रात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्या करण्या मागील कारण लिहिलं आहे. या सुसाइड नोटमध्ये त्यांनी त्याच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांची नाव लिहिली आहेत. भैय्यासाब व्हावळे यांचे नांदेडच्या हदगावमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेम संबंध होते. पण तरुणीच्या घरच्यांना यांच्यातील प्रेम मान्य नव्हते. प्रेयसीचे वडील पोलिसांना धमकी देत होते. 'तू जीव दे नाहीतर तुझी नोकरी घालवणार' प्रेयसीच्या वडिलांकडून त्यांना वारंवार धमकी दिली जात होती.
प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून भैय्यासाब व्हावळे यांना जीवे ठार मारण्याचे आणि पोलीस दलातून सस्पेंड करण्याची धमकी देत मानसिक छळ करत होते. त्या सोबत पोलिसाच्या प्रेयसीच्या आईने 'तू आत्महत्या कर नाही तर तुझी नोकरी घालवू' अशी धमकी दिली होती. त्यांच्या प्रेयसीच्या आई-वडिलांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरवलं होतं. याच त्रासाला कंटाळून व्हावळे यांनी आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या प्रकरणी पोलिसांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील वाकोला पोलिसांनी भैय्यासाब यांच्या प्रेयसीच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.