ओळख ना पाळख, काम आटोपून घरी जाणाऱ्या इसमाचा दुर्दैवी अंत; वर्ध्यात भरदुपारी रस्त्यावर हत्याकांड

महत्वाची बाब म्हणजे या घटनेतील आरोपी व मृतक हे एकमेकांना ओळखतही नव्हते. परंतु नशेच्या अमलाखाली असलेल्या करण मोहितेने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचं कळतंय.

Advertisement
Read Time: 2 mins
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतलं आहे

- निलेश बंगाले, प्रतिनिधी

वर्ध्याच्या देवळी येथील पोलीस वसाहती समोर दुपारच्या दरम्यान एका इसमाची डोक्यात दगड टाकून हत्या केली आहे.  विनोद डोमाजी भरणे (वय 45) असे मृतकाचे नाव असून करण मोहिते (वय 20) असे आरोपीचे नाव असल्याचं कळतंय. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.

रोजगार हमीच्या कार्यालयात कामाकरता गेले होते मृतक विनोद भरणे -

सोनेगाव येथील विनोद डोमाजी भरणे हे रोजगार हमी च्या कार्यालयात  कामाकरिता देवळी येथे आले होते. काम आटोपल्यावर आपल्या गावी परत जाण्याच्या उद्देशाने विनोद भरणे पोलीस वसाहतीसमोरील चौकात रिक्षाची वाट पहात उभे असताना करण मोहिते याने अचानक विनोद भरणे यांना दगडाने मारायला सुरुवात केली. यावेळी विनोद भऱणे यांच्यासोबत असलेली महिला सुद्धा जखमी झाली, पण ती कशीबशी तिथून जीव मुठीत धरून पळाली व बाजूला असलेल्या एका टँकर च्या मागे लपली. इकडे आरोपी करण मोहितेने विनोद यांना ओढत घेऊन रस्त्यावर आणलं व त्यांच्या डोक्यावर दगड टाकून त्यांची हत्या केली.

नशेच्या भरात आरोपीने केलं कृत्य -

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण मोहिते विनोद यांचा प्राण गेल्यानंतरही त्यांच्या डोक्यावर वार करत राहिला. ज्यामुळे विनोद यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. महत्वाची बाब म्हणजे या घटनेतील आरोपी व मृतक हे एकमेकांना ओळखतही नव्हते. परंतु नशेच्या अमलाखाली असलेल्या करण मोहितेने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचं कळतंय.

दरम्यान हा सर्व प्रकार डोळ्यासमोर पाहिलेल्या महिलेला चक्कर आल्यामुळे ती बेशुद्ध होऊन पडली. या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी करण मोहितेला अटक केली आहे. सदर घटनेची माहिती मृतक विनोद भरणे याच्या पत्नीला देण्यात आली आहे. हा सर्व प्रकार कळल्यानंतर विनोद यांच्या पत्नीची तब्येत खालावली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Advertisement

हे ही वाचा - मांडव सजला, वऱ्हाडी जमले; मात्र लग्नाआधी नवरीची पार्लरमध्ये गोळ्या झाडून हत्या  

Topics mentioned in this article