कित्येकवेळा आपण शायरीत किंवा कवितांमध्ये कवीच्या हातून मद्याचा प्याला पडून फुटल्याचे संदर्भ वाचतो. त्या मांडणीला साहित्याचा आविष्कार समजून दाद देतो. मात्र, अलीकडेच केवळ मद्याचा ग्लास हातातून खाली पडल्यामुळे एकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण अत्यंत क्षुल्लक. एका काचेच्या ग्लासामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याचा प्रकार संतापजनक आहे. दारुच्या दुकानात कामावर असलेल्या पाच जणांनी अत्यंत क्षुल्लक घटनेमुळे रागावून चक्क एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूर शहराजवळच्या खडगाव परिसरात देशी दारू दुकानात मद्य पिण्यासाठी गेलेल्या या तरुणाची चूक केवळ इतकीच होती की मद्याचा ग्लास त्याच्या हातातून निसटला. पाचपेक्षा जास्त जणांनी त्याला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांडपाण्याच्या नाल्याच्या शेजारी फेकून दिले. तिथेच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सूरज सुभाष भलावी असं मृत तरुणाचं नाव असून तो रात्रीच्या सुमारास देशी दारू पिण्यासाठी खडगाव मार्गावरील सायरे देशी दारू दुकान येथे गेला होता.
नक्की वाचा - Pune Crime : नामांकित मेडिकल महाविद्यालयात 4 कनिष्ठ डॉक्टरांचं रॅगिंग, 3 जणांचं निलंबन
मात्र, मद्य प्राशन करताना त्याच्या हातून एक अत्यंत किरकोळ चूक घडली. पिताना चुकून ग्लास त्याच्या हातून खाली पडला व फुटला. एवढ्याशा कारणा ने तेथील कामगारांनी शिवीगाळ करत त्याला बेदम मारहाण केली आणि तो बेशुद्ध झाल्याचा समज करून त्याला बाजूच्या नाल्यात फेकून दिले. मात्र, पोलिसांनी लगेच तपास करीत खरे कारण शोधून काढले आणि यातील पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.