- संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur News: नागपुरात होळीच्या दिवशी अतिशय भयंकर आणि संतापजनक घटना घडलीय. खेळताना अंगावर रंग उडवल्याच्या किरकोळ कारणावरून एका आजीने आपल्या चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतले आहे. कोराडी परिसरातील ही घटना आहे. या अमानुष घटनेत चिमुरडा ओम गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेविरोधात परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे हा चार वर्षांचा मुलगा आपल्या घराबाहेर पिचकारीने खेळत होता. त्याच वेळी त्याची आजी सिंधू ठाकरे (आईची आई) होळीच्या लाकडावर गरम केलेले उकळते पाणी बादलीत भरून घरात नेत होत्या. खेळण्याच्या ओघात ओमने त्याच्या छोट्या पिचकारीने आजीच्या अंगावर थोडा रंग उडवला. या किरकोळ गोष्टीमुळे आजीचा संताप अनावर झाला.
संतापाच्या भरात सिंधू ठाकरे यांनी विचार न करता हातातील उकळत्या पाण्याची संपूर्ण बादली चार वर्षांच्या ओमच्या अंगावर उपडी केली. उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने प्रचंड ओरडू लागला. या घटनेत ओमचा कमरेखालील भाग पूर्णपणे भाजला गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने तपास सुरू केलाय.
(नक्की वाचा: Nandurbar News: नंदुरबार हादरले! ती अचानक झाली गायब, 21 दिवसांनंतर शेताच्या बांधावर सापडला मृतदेह)
चिमुकला 45 टक्के मुलगा भाजला
ओमचा टाहो ऐकून परिसरातील लोक आणि नातेवाईक धावून आले. तातडीने त्याच्या अंगावर थंड पाणी टाकण्यात आले, पण तोपर्यंत ओम गंभीररीत्या भाजला गेला होता. त्याला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार ओम सुमारे 45 टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
CCTV व्हायरल आणि पोलीस तपास
ही सर्व घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कशा प्रकारे आजीने रागाच्या भरात बादलीभर उकळते पाणी चिमुरड्यावर ओतले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. व्हायरल सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे.
पाहा सीसीटीव्ही फुटेज | CCTV Footage | VIDEO
सख्ख्या आजीनेच नातवाचा असा अमानुष छळ केल्यामुळे नाती आणि माणुसकी जीवंत आहे की नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.