Nagpur Factor Blast News : नागपूरजवळील काटोल तालुक्यातील रावळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या खाणकामासाठी आणि औद्योगिक स्फोटकांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे. या स्फोटातून भारती शेंडे सुखरुप बचावल्या आहेत. त्या वेळीच बाहेर पडल्या त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र खोलीतून बाहेर पडताना त्यांनी जे दृश्य पाहिलं ते अंगावर काटा आणणारं होतं.
नेमकं काय घडलं?
सकाळी ६ वाजता शिफ्ट सुरू झाली होती. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. रावळगाव येथील एसबीएल कंपनीत खाणकामासाठी वापरले जाणारे डेटोनेटर आणि इतर स्फोटक साहित्य तयार केले जाते. नेहमीप्रमाणे कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर डेटोनेटर निर्मिती प्रक्रिये दरम्यान अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरापलीकडेही ऐकू गेला, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोट इतका तीव्र होता की संबंधित युनिटचा काही भाग कोसळला आहे. या घटनेनंतर आकाशात धुराचे प्रचंड लोट उठताना दिसले.
बचावलेल्या कामगार महिलेचा धक्कादायक अनुभव...
या स्फोटात अनेक महिला वाचल्या आहेत. त्यातील भारती चंद्रकांत शेंडे या वेळेत कंपनीतून बाहेर पडल्या म्हणून बचावल्या आहेत. त्यांच्या शरीरभर जळलेल्याच्या जखमा आहेत. पायाला टाकेही लागले आहेत. मात्र सुदैवाने त्या बचावल्या. भारतींनी त्यावेळी कंपनीत काय घडलं याबाबत धक्कादायक अनुभव कथन केला. आज सकाळीही भारतीसह जवळपास ३० हून अधिक महिला या कंपनीत काम करीत होत्या. सकाळी ६ वाजता पहिली शिफ्ट सुरू झाली. घटना घडली त्यावेळी भारती सेल बनविण्याचं काम करीत होत्या. साधारण ६.४५ च्या दरम्यान ब्लास्टचा मोठा आवाज झाला. भारतीने सांगितलं, नेमका आवाज कुठून आला आम्हाला काहीच कळालं नाही. मोठा आवाज झाला आणि मला घेरी आली. मी कशीबशी बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. तर बाहेर कित्येक महिला जळालेल्या अवस्थेत पडल्या होत्या. महिलांचे मृतदेह जमिनीवर अस्ताव्यस्त पडले होते. मृतदेह धडाधड पेटत होते. त्यानंतर भारतीसह काहीजण बाहेर पडण्यात यशस्वी झाले.
भारतीच्या नवऱ्याला हृदयाचा आजार आहे. हाताला काहीच काम नव्हतं. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी भारतीने या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. त्यांना १७,५०० रुपये महिना पगार मिळतो. काम सोपं नाही. सुरक्षा नाही, धोका आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी धोका पचवित भारतीसारख्या कित्येक महिला तेथे काम करीत होत्या.
मृतदेहाची ओळख पटवणं कठीण...
नागपूर जिल्ह्यातील बारूद कारखान्यात आज सकाळी झालेला स्फोटाची भीषणता यावरून कळून येते की झालेल्या स्फोटात मृत पडलेल्या काही महिला कामगारांचे मृतदेह ओळखण्यापलीकडे आहेत. या काही मृतदेहांची ओळख पटविणे अत्यंत कठीण झाले आहे, त्यामुळे DNA चाचणी करावी लागणार आहे. नातेवाईकांचे सँपल घेतल्यानंतर मृतदेहांची ओळख पटविता येणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र बारुद कारखाने कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने लावले गंभीर आरोप...
नागपूर जिल्ह्यातील विस्फोटक निर्मिती करणाऱ्या कारखान्यांत कित्येक नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. अग्निशमन विभागाची एकही गाडी वेळेवर आली नाही. दोन ते तीन लोक गेट जवळ होते ते लोक बाहेर पडू शकले बाकीचे आत मधले बाहेर पडू शकले नाही. हा आकडा ४२ ते ४३ च्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. सुरक्षिततेसाठी अनेकवेळा संघटनेच्या मार्फत पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या जबाबदारी होती असेही काही लोक या मध्ये मृत्युमुखी पडले आहे. त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा आणि कंपनीवर कारवाई करण्यात यावी.