Nagpur Crime : नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागातील असिस्टंट प्रोफेसर महिलेचा राहत्या घरात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह घरात आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यावर रॉडने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून हुडकेश्वर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मृत महिलेचे नाव अर्चना अनिल राहुले असून, त्या लाडेकर ले-आउट, हुडकेश्वर येथे राहत होत्या. अर्चना यांचे पती अनिल राहुले हे रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. ते आठवड्यातून एक-दोन दिवस नागपुरात येत असतात.
नक्की वाचा - Kalyan Crime : क्रूरकर्माचा शेवट, विशाल गवळीची आत्महत्या; वाचा कल्याण गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम
शनिवारी सायंकाळी अनिल नागपुरात आले. घरी पोहोचल्यानंतर त्यांना घरातून दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली. घरात गेल्यानंतर त्यांना पत्नी अर्चनाचा मृतदेह बेडजवळ पडलेला आढळला. त्यांच्या डोक्यात रॉडने मारण्यात आल्यामुळे मृतदेहाच्या शेजारी सुकलेले रक्त दिसून आले. त्यांनी ही माहिती शेजाऱ्यांना दिल्यानंतर, शेजाऱ्यांनी पोलिसांना सूचित केलं.
हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मृत अर्चना यांचा मुलगा हाही करीमनगर येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. चोराच्या उद्देशाने हा खून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.