प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी
Nagpur Crime : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील प्राध्यापिका डॉ. अर्चना अनिल राहुले यांचा मृतदेह 13 डिसेंबरला त्यांच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. पतीने घराचं दार उघडलं तेव्हा त्यांची पत्नी अर्चना बेडच्या शेजारी मृतावस्थेत आढळल्या होत्या. पतीने शेजारच्यांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. अखेर त्यांच्या हत्येचा उलगडा झाला आहे. त्यांच्या डॅाक्टर पतीनेच त्यांचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या डॉ. अनिल यांनी पत्नीची निघृणपणे हत्या केली. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या या सुशिक्षित घरात हा धक्कादायक प्रकार घडला.
पतीने चारित्र्याच्या संशयावरुन भावाच्या मदतीने प्राध्यापक पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडीकर ले-आउट येथे शनिवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी विभागातील प्राध्यापिका डॉ. अर्चना अनिल राहुले यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अटकेतील आरोपींची नावे डॉ. अनिल शिवशंकर राहुले (वय 52) आणि त्याचा भाऊ राजू राहुले (वय 59, रा. खैरलांजी, साकोली) अशी आहेत. डॉ. अर्चना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. अनिल हा रायपूर मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहे. तर राजू खैरलांजी येथे शेती करतो. अर्चना यांचा मुलगा आदित्य सध्या करीमनगर येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांपासून अनिल अर्चना यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि त्यांना सातत्याने मारहाण करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याने अर्चना यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. ही माहिती अर्चना यांनी त्यांची बहिण डॉ. निमा सोनारे यांना सांगितली होती. अर्चना आणि अनिल यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. अखेर अनिलने भावाच्या मदतीने अर्चनाचा खून करण्याचा कट रचला.
नक्की वाचा - Kalyan Crime : क्रूरकर्माचा शेवट, विशाल गवळीची आत्महत्या; वाचा कल्याण गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम
9 एप्रिल रोजी अनिल आपल्या भावासह घरी आला. त्याने अर्चनासोबत वाद घातला. वादाच्या दरम्यान अनिलने अर्चनाचे पाय पकडले आणि राजूने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार केला. यात अर्चना यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घराला सेंट्रल लॉक लावून दोघेही पसार झाले. शनिवारी 12 एप्रिल रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास अनिल पुन्हा घरी आला. त्यावेळी अर्चना या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. मृतदेह तीन दिवसांपासून तसाच पडून होता. त्यामुळे मृतदेह कुजू लागला होता. त्याने जोरजोराने रडायला सुरुवात केली, त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. एका शेजाऱ्याने याबाबत हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलीस येताच अनिलने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले. पोलिसांनी पंचनामा करून घराची तपासणी केली असता, चोरीच्या उद्देशातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, नातेवाइकांच्या चौकशीत अर्चना आणि अनिल यांच्यात सातत्याने वाद होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी अनिलला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. सध्या अनिल आणि राजू या दोघांनाही 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.